मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने पक्षाचे ८४ नगरसेवक आणि ४ अपक्ष नगरसेवकांची गट नोंदणी केली आहे. आता महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका झाल्यास जबाबदार नगरसेवकावर थेट निलंबनाची कारवाई करता येणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देणा-या नगरसेवकांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. वांद्रे येथील एका अपक्ष नगरसेविकेने शिवसेनेला साथ देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा पक्षाने केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेला चार अपक्षांची साथ मिळाली आहे. महापौरपदासाठी ११४ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी दगाफटका होऊ नये याकडेही शिवसेनेने लक्ष दिले आहे.
मंगळवारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आणि चार अपक्ष नगरसेवकांची नवी मुंबईतील कोकण विभागीय कार्यालयात गट नोंदणी करण्यात आली आहे. आता या ८८ नगरसेवकांची एक गट म्हणून नोंदणी झाली आहे. गटासाठी जारी झालेला व्हीप गटातील सर्व नगरसेवकांना लागू राहणार आहे. दगाफटका देणा-या नगरसेवकावर निलंबनाची कारवाईदेखील करता येणार आहे. गट नोंदणीची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबई महापालिकेत महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा केला. गट स्थापन करणे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे होते असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. वांद्रेमधील एका अपक्ष नगरसेविकेने शिवसेनेला साथ देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा सेनेने केला आहे. यानुसार शिवसेनेचे संख्याबळ ८९ वर पोहोचू शकेल. विशेष म्हणजे याच अपक्ष नगरसेविकेचा आम्हाला पाठिंबा आहे असा दावा भाजपनेही केला होता. त्यामुळे संबंधीत नगरसेविका भाजपला साथ देणार की शिवसेनेला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.