दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र लोकसभेच्या मागील निवडणुकीत मोदी लाटेमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. असे असले तरी चिराबाजार, ठाकूरद्वार, गिरगाव, कुंभारवाडा आदी मराठी पट्टय़ात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळत आले आहे. या मतदारसंघातील एकेकाळी अस्सल मराठमोळा विभाग असलेला गिरगाव परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या पट्टय़ातील मराठी मतांच्या जोरावर शिवसेनेचे नगरसेवक हमखास निवडून येत होते. ऑपेरा हाऊस विधानसभा मतदारसंघ मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला आणि मलबार हिल मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली. स्थानिक शिवसैनिकांमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर येऊ नये आणि भाजपबरोबरचे हितसंबंध जपण्यासाठी शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपच्या झोळीत टाकला. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींना हाताशी ध्न३न या मतदारसंघात आपले प्राबल्य वाढविले. फिरते वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा, गल्लीबोळांमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन, गणेशोत्सव-दिवाळीमध्ये घरोघरी भेटवस्तूंचे वाटप आदींच्या माध्यमातून मंगलप्रभात लोढा घराघरात पोहोचले आणि हा परिसर शिवसेनेच्या हातून कधी निसटला ते शिवसैनिकांना कळलेच नाही.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी विधानसभा मतदारसंघ येतात. या सहापैकी कुलाबा, मलबार हिलमध्ये भाजपचा, वरळी, शिवडीमध्ये शिवसेनेचा, मुंबादेवीमध्ये काँग्रेसचा, तर भायखळ्यामध्ये एएमआयएमचा विजय झाला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ३४ पालिका प्रभागांचा समावेश होता. त्यापैकी १३ प्रभागांमध्ये शिवसेनेचे, तर तीन प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक होते. तसेच काँग्रेसचे १०, अ. भा. सेनेचे दोन, मनसेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, समाजवादी पार्टीचा एक, तर अपक्ष असे बलाबल होते. मात्र पालिका निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपने १० जागांवर विजय मिळवत धडक मारली. तर मागील निवडणुकीच्या तुलनेत एक जागा अधिक मिळविणाऱ्या शिवसेनेचे १४ नगरसेवक पालिकेत गेले आहेत. काँग्रेसला या परिसरात मोठा फटका बसला असून काँग्रेसचे केवळ पाच उमेदवार विजयी झाले आहेत. अ. भा. सेनेलाही केवळ एका उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले, तर मनसे आणि राष्ट्रवादीला आपल्या जागा राखता आल्या नाहीत. दक्षिण मुंबईत शिवसेनेला १४ जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगावात मात्र भाजपने मुसंडी मारली आहे. शिवसेनेतील अंतर्गत लाथाळ्या आणि स्थानिक नेत्यांमध्ये नसलेली एकवाक्यता यामुळे शिवसेनेला आपला गिरगावचा बालेकिल्ला गमवावा लागला आहे.
चुरशीच्या लढती
- अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी आणि वंदना गवळी या भायखळा परिसरातील अनुक्रमे २१२ आणि २०७ प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे या दोघींच्या विरोधात युतीने उमेदवार उभे केले नव्हते. मात्र युती तुटल्यानंतर अ. भा. सेनेने शिवसेना आणि भाजप यापैकी कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. गीता गवळी यांनी आपला गड राखला. मात्र भाजप उमेदवार सुरेखा लोखंडे यांनी आघाडी घेत वंदना गवळी यांचा पराभव केला.
- गिरगावमधील प्रभाग क्रमांक २१८ भाजप आमदार मंगलप्रभात लोढा आणि रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी प्रतिष्ठेचा बनविला होता. शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार करीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडले. भाजप उमेदवार डॉ. अनुराधा पोतदार या पाच हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. दोन वेळा निवडणुकीत विजयी होऊन पालिका सभागृहात गेलेल्या शिवसेनेच्या मीनल जुवाटकर यांना पराभव पत्करावा लागला.
- प्रभाग क्रमांक २२१ मधून भाजपने आमदार राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक जनक संघवी यांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र जनक संघवी यांना आकाश पुरोहित यांच्याशी कडवी झुंज देता आली नाही. राज के. पुरोहित यांच्या कामाच्या पावतीच्या रूपात आकाश पुरोहित यांचा विजय झाला.
- सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांना शिवसेनेने प्रभाग क्रमांक २२० मधून उमेदवारी दिली होती. भाजपचे अतुल शहा यांच्याशी त्यांचा सामना झाला. मतमोजणीअंती अतुल शहा ३३ मतांनी विजयी झाले. त्यामुळे सुरेंद्र बागलकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत दोघांनाही समसमान मते मिळाली. त्यामुळे पुन्हा फेरमतमोजणी करण्यात आली. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाल्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत एका लहान मुलीने सेना आणि भाजप नेत्यांच्या समक्ष चिठ्ठी काढली.त्यामध्ये शहा विजयी झाले.