शिवसेनेची ताठर भूमिका ; मुख्यमंत्री ‘फसवे’ असल्याची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी तोफ डागल्याने भाजपला युतीसाठी कोणताही प्रस्ताव न पाठविण्याचे शिवसेनेने ठरविले असून शिवसेनेचाच महापौर निवडून आणण्याचा चंग बांधला आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. काँग्रेसबरोबर जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असले तरी ‘त्यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कुठेही व कधीही घेणार नसल्याचे जाहीर करावे,’ असे आव्हान शिवसेना प्रवक्ते व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहे.  मुख्यमंत्री फडणवीस हे गोड बोलून ‘फसवे’ असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

मुंबई महापालिकेसाठी चार अपक्ष नगरसेवकांनी पािठबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८८ झाले असून काँग्रेससह अन्य पक्षांचा प्रत्यक्ष किंवा छुपा पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाने व्यूहरचना केली आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेमध्ये शिवसेना सहभागी असून मुंबईत भाजपला सत्तेत सहभागी करून न घेतल्यास किंवा युती न केल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटतील. सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होईल. त्यामुळे भाजपला युतीचा प्रस्ताव पाठवावा, असे मत शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. मात्र भाजपची रणनीती शिवसेनेला संपविण्याची असल्याने आणि फडणवीस, खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांची मालमत्ता, उत्पन्न, कथित काळापैसा आदी मुद्दय़ांवर थेट वैयक्तिक हल्ला चढविल्याने ठाकरे हे कमालीचे दुखावले गेले आहेत. त्यातच मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याने आणि भाजपने चांगली कामगिरी केल्याने आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर व स्थायी समिती अध्यक्ष निवडून आणण्याची व्यूहरचना शिवसेना करीत आहे. मुंबईत शिवसेनेऐवजी भाजपचा महापौर, हे ठाकरे यांना कदापि सहन होणार नाही. त्यामुळे भाजपशी कोणतीही तडजोड न करण्याचे ठाकरे यांनी ठरविले आहे.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने कोणत्याही पक्षाला युतीसाठी प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचाच महापौर ९ मार्चला निवडून येईल, असे ठाम प्रतिपादन मात्र त्यांनी केले. तर राजकारणात काँग्रेसच काय कोणीही अस्पृश्य नसतो, असे सूचक वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले आहे.  महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा मिळत असल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस, आशीष शेलार आदी भाजप नेत्यांनी आता भाजपचाच महापौर होणार, अशी वक्तव्ये करण्याचे बंद केले असल्याचे मत काही सेना नेत्यांनी व्यक्त केले.

मुंबईत महापौर शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पक्षावरच्या निष्ठा ढळू देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले.

शिवसेनेच्या महापालिकेतील विजयी उमेदवारांचा मेळावा शिवसेना भवनमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी महापौरपद शिवसेनेकडेच राहील व ते कोणालाही हिसकावून घेता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कोणत्याही आमिषांना बळी पडू नका आणि विश्वास व ध्येयनिष्ठा ढळू देऊ नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याच जोरावर शिवसेनेने या निवडणुकीत विजय मिळविला, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार, सुनील तटकरे अजून मोकळे कसे?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘पारदर्शी’च्या मुद्दय़ावर शिवसेना प्रवक्ते व राज्यमंत्री शिवतारे यांनी हल्ला चढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीही पाठिंबा घेणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले, तसे आता पुन्हा जाहीर करावे, असे आव्हान देत शिवतारे म्हणाले, जलसंपदा विभागातील ७० हजार कोटी रुपयांच्या प्रचंड गैरव्यवहाराच्या मुद्दय़ावरून रान उठवून आम्ही सत्तेवर आलो. त्या चौकशीचे आता काय झाले? अजित पवार, सुनील तटकरे हे नेते अजून मोकळे कसे? कोकण विभागातील अडीच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कंत्राटे रद्द झाल्यावर पुढे काय झाले? याची सर्व माहिती ‘पारदर्शी’पणे जनतेसमोर यावी. काँग्रेस तर भाजपला कधीच पाठिंबा देणार नाही, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती नेत्यांना भाजपने प्रवेश दिले, किती गुंडांना सामावून घेतले, या निवडणुकांमध्ये कोटय़वधी रुपये वाटण्यासाठी भाजपकडे पैसे कुठून आले, याचे उत्तर देण्याची मागणी शिवतारे यांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची फडणवीस यांची योग्यता नसल्याचेही ते म्हणाले.