राज्यातील दहा महापालिकांमध्ये भाजपच्या विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या ही काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त असून, सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपला मिळालेली मते ही काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची झोप उडवणारी आहेत. शिवसेनेला मुंबईत २८.२९ टक्के मते मिळाली असली तरी भाजप सेनेपेक्षा अवघ्या एक टक्का मतांनीच मागे आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला १७.३४ टक्के, तर भाजपला ६.७८ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला १६.२८ टक्के, तर मनसेला १५.८९ टक्के मते मिळाली होती. याचा विचार करता या वेळी महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढल्यानंतर दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये वाढ झाली असली तरी भाजपच्या मतांची टक्केवारी सर्वच पक्षांची झोप उडवणारी आहे. या वेळी मुंबई महापालिकेत शिवसेनेला १४,४३,९६९ मते मिळाली, तर भाजपला २७.२८ टक्के म्हणजे १३,९२,६७६ मते मिळाली आहेत. मतदानाचा वाढलेला टक्क्याचा फायदा भाजपला मिळून त्यांच्या मतांमध्ये, तसेच जागांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. २०१२ मध्ये काँग्रेसला ९,५७,७११ मते मिळाली होती, ती या वेळी एक लाखाहून अधिक घटून ८,१३,१७७ एवढी झाली. या निवडणुकीत ८७ हजार लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला ही गोष्टही महत्त्वाची मानावी लागेल. अल्पावधीत मुंबईत गेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मते मिळविणाऱ्या मनसेची घसरण धक्कादायक म्हणावी लागेल. गेल्या पालिका निवडणुकीत मनसेला १५.८९ टक्के मते मिळाली होती व मनसेचे २८ नगरसेवक विजयी झाले होते, तर या वेळी मनसेला ७.७३ टक्के मते मिळून अवघ्या सात जागी विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील स्थान तसे नगण्यच होते. त्यांना गेल्या पालिका निवडणुकीत साडेपाच टक्के मते मिळाली होती, ती या वेळी पावणेपाच टक्के एवढी झाली आहेत.भाजपला प्रामुख्याने उत्तर मुंबई व दक्षिण मुंबईत मोठय़ा प्रामाणात जागा मिळाल्या आहेत. उत्तर मुंबईत गेल्या वेळी भाजपचे ११ नगरसेवक होते ते २४ एवढे वाढले. गुजराती, जैन, तसेच उत्तर भारतीयांनी भाजपला एकगठ्ठा मतदान केल्यामुळेच भाजपला मुंबईत मोठय़ा प्रमाणात यश मिळाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेला मराठी मतदारांनी साथ दिल्यामुळेच शिवसेनेचे ८४ उमेदवार विजयी झाले. त्या तुलनेत मनसेला राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये मतदारांनी साफ झिडकारल्याचे दिसून येते. मनसेने हस्तगत केलेला शिवसेनेचा दादरचा बालेकिल्ला या वेळी शिवसेनेने पुन्हा घेतला असला तरी येथे भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान झाले आहे. २०१२ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला दादरमधील सहा जागांसाठी ४६ हजार एवढे मतदान झाले होते, तर मनसेला ४३ हजार मते मिळाली होती. भाजपला त्या वेळी ३३,००० मतांवर समाधान मानावे लागले होते, मात्र या वेळी शिवसेनेला पुन्हा ४८ हजार मते मिळाली, तर भाजपला ४३ हजार मते मिळाली. मनसेने दादरमध्ये सातत्याने अनेक प्रश्नांवर आवाज उठवला, तसेच राज ठाकरे हे स्वत: दादरमध्ये राहात असतानाही येथे मनसेला केवळ ३३ हजार मतांवर समाधान मानावे लागले.