शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास ..
महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, सरकार वाचविण्यासाठी भाजपकडून अनेक शक्यतांवर विचार करण्यात येत आहे. आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामागे काही राजकीय आडाखे असल्याचे सांगितले जाते. सर्वच पक्षांतील आमदारांची अडीच वर्षांत पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची मानसिकता नाही, ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणार आहे, अशी पक्षातील उच्चपदस्थांची अटकळ आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटवावरून शिवसेना व भाजपची युती तुटली असली, तरी या दोन पक्षातील वाद इतका विकोपाला गेला आहे की, त्यामुळे राज्य सरकारला धोका असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेनेच राज्य सरकार नोटीसवर असल्याचे सांगून राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेची ही राजकीय खेळी असली, तरी भाजपने मात्र अतिशय सावधपणे त्याबाबतची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल किंवा नाही, याबाबत दोन शक्यता गृहीत धरण्यात येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८० च्या वर जागा मिळतील, असा त्या पक्षातील नेत्यांचा अंदाज आहे.
शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले तर, सत्ता स्थापनेसाठी भाजपला त्याच पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. किंवा शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तरी, त्यांनाही सत्तेचे गणित जमविण्यासाठी भाजपचाच पाठिंबा घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या सत्तेत एकत्र आल्यानंतर, राज्यातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता नाही. राजकीय जाणकारांच्या मते कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू स्थिती असेल, परिणामी पालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजप व सेनेला सबुरीने घ्यावे लागेल, त्यामुळे राज्यातील सरकार अबाधित राहील, असा त्यांचा होरा आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक असताना आणि केंद्रात व राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असताना त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करीत आहेत, त्यावरून पालिका निवडणुकीतील यशापयशाची पर्वा न करता सत्तेतून बाहेर पडण्याची त्यांनी तयारी केली असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे सरकार वाचविण्यासाठी भाजपकडून अनेक पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपचे १२२ संख्याबळ आहे. अपक्ष व काही लहान पक्षांच्या १२ ते १३ आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो.
बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे, तर भाजप १३५ चे गणित सहजपणे जमवू शकते. इतके संख्याबळ असलेले सरकार सहसा पडत नाही, अशी भाजपमधील धुरीणांची अटकळ आहे. केंद्रात सत्ता असणे ही त्यांना जमेची बाजू वाटत आहे. अडीच वर्षांत निवडणुकांना सामोरे जाण्याची आमदारांची तयारी नाही, त्यामुळे सरकार कार्यकाल पूर्ण करू शकते, असे त्यामागचे आडाखे असल्याचे सांगितले जाते.