शिवसेनेच्या आक्रमक प्रचाराने भाजपच्या गटात चिंता

भाजपच्या प्रचाराने अपेक्षित गती न घेतल्याने आणि तो अद्याप विस्कळीत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मध्यरात्री भाजप नेत्यांच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शिवसेनेने आक्रमक प्रचार करीत आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून एकमेकांमधील मतभेद मिटवून जोमाने कामाला लागावे, अशा खरमरीत सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील सर्व नेत्यांना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असली तरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा करिष्मा नसल्याने ही निवडणूक सोपी नाही, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे शिवसेनेविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व खासदार किरीट सोमय्या सांभाळत आहेत. शिवसेनेविरोधात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलण्याची जबाबदारी ज्येष्ठ मंत्री विनोद तावडे, शेलार व मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्यावर देण्यात आली आहे. तरीही मुख्य लढत शिवसेना व भाजपमध्येच असल्याने खासदार, आमदार व अन्य नेत्यांनी शिवसेनेविरोधात प्रचारात आक्रमकपणे उतरणे अपेक्षित असताना अजून ते झालेले नाही. मंत्री प्रकाश मेहता, तावडे, खासदार पूनम महाजन व अन्य नेत्यांनी शिवसेनेविरोधात बोलण्याचे टाळले आहे. सर्व नेते प्रचारात पूर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी मध्यरात्री ‘वर्षां’ निवासस्थानी बैठक बोलावून निवडणूक तयारी व प्रचाराचा आढावा घेतला.