नगरसेवकांना उत्पन्न जाहीर करण्याची शपथ
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी निश्चलनीकरणानंतर ३१ डिसेंबपर्यंत भाजप आमदार-खासदारांच्या बँक खात्यात किती रक्कम भरण्यात आली, याचा तपशील मागविला असला तरी अजून तो गुलदस्त्यातच आहे. मुंबई महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांना दरवर्षी मालमत्ता व उत्पन्न जाहीर करण्याची शपथ भाजपने दिली. मात्र पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:सह आपले मंत्री व भाजपच्या आमदारांच्या उत्पन्नाचा तपशील लगेच जाहीर करून ‘आदर्श’ पायंडा घालून द्यावा आणि दरवर्षी तो पाळावा, अशी मागणी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढत भाजपचा कारभार मात्र स्वच्छ व पारदर्शी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस व भाजप नेते देत आहेत. त्यामुळे महापालिकेत निवडून येणाऱ्या भाजप नगरसेवकांनी त्यांच्या मालमत्ता व उत्पन्नाचा तपशील दरवर्षी जाहीर करावा, अशी शपथ त्यांना रविवारी दिली. मात्र सध्या मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदारांकडून दरवर्षी उत्पन्न व मालमत्तेचा तपशील वेबसाइटवर जाहीर केला जात नाही. त्यामुळे पारदर्शी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ निवडून येणाऱ्या नगरसेवकांनाच नाही, तर स्वत:पासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे परब यांनी केली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील भाजप आमदार-खासदारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये किती रक्कम ३१ डिसेंबपर्यंत भरली गेली, याचा तपशील मागितला होता. हा तपशील अजूनही गुलदस्त्यात असून ‘ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ,’ असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तो उघड केलेला नाही. त्यामुळे तो जनतेला कधी सांगणार, अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे.
