खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाची दिनदर्शिका आणि रोजनिशीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधानांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या विरोधात आक्रमक होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेतील भ्रष्टाचारासोबत खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाची दिनदर्शिका आणि रोजनिशीचा मुद्दाही हाती घेतल्याची चर्चा मुंबईत सुरू झाली आहे.
खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाची दिनदर्शिका आणि रोजनिशीवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्राऐवजी मोदींची प्रतिमा झळकविण्यात आल्याने देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंतप्रधानांनी महात्मा गांधींचा अपमान केला आहे. दिनदर्शिका आणि रोजनिशीवरून गांधीजींचे छायाचित्र का हटविण्यात आले याचे कारण पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.
खादी आणि ग्रामोद्योगासाठी महात्मा गांधी सरकारला योग्य वाटत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला आहे. महामंडळाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशी पुनर्मुद्रण करून त्यावर गांधींचे छायाचित्र प्रकाशित करावे, अन्यथा मुंबईमधील ग्रामोद्योग महामंडळाचे एकही दुकान उघडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.