राज्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले तरी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार आणि त्यांचा मुलगा आमदार असलेल्या जालना जिल्ह्य़ात भाजपला फटका बसला होता. स्वत: दावने यांच्या पालिकेत भाजपचा पराभव झाला होता. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दानवे सावध झाले आहेत. स्वत:च्याच जिल्ह्य़ात पक्षाचा पराभव झाल्यास काय उत्तर देणार, याची चिंता दानवे यांना आहे.

स्वतंत्र जालना जिल्हा परिषद १९८१ साली अस्तित्वात आल्यानंतर प्रारंभीची बारा वष्रे प्रशासकीय कारकीर्द राहिली. १९९२ पासून पुढील २५ वर्षांपर्यंत लोकनिर्वाचित जिल्हा परिषदेत साडेअठरा वर्षे शिवसेना आणि भाजप युतीचे पदाधिकारी राहिले. या वेळेस प्रथमच शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे जनतेत निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी पाच वेळेस राहिलेले आहे. तर पूर्वीच्या एकत्रित काँग्रेसकडे पाच वर्षे आणि राष्ट्रवादीकडे अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद राहिलेले आहे.

घराणेशाहीची परंपरा

जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागा असून त्यापकी ५३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार असून तीन ठिकाणी त्यांचे पुरस्कृत उमेदवार आहेत. भाजप सर्व जागा लढवत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होऊन जागावाटप जाहीर झाले होते. परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे आहेत. जिल्हय़ात पाचपकी तीन विधानसभा सदस्य भाजपचे असून पालकमंत्री बबनराव लोणीकर हे त्याच पक्षाचे आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ आहे. भोकरदन, जाफराबाद, बदनापूर हे तीन तालुके भाजप आमदारांच्या कार्यक्षेत्रातील असून त्या भागांत जिल्हा परिषदेच्या ५६ पकी २१ जागा आहेत. मागील निवडणुकीत या तीन तालुक्यांतून भाजपचे १५ पकी १२ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे या वेळेस या तीन तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर प्रचारसभा भोकरदन तालुक्यातील राजूर येथे घेण्यात आली. खासदार दानवे यांच्या कन्या वैशाली पांडे या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गटातून निवडणूक लढवीत आहेत. तर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे परतूर तालुक्यातील आष्टी गटातून उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष बळीराम कडपे राष्ट्रवादीकडून मदानात उतरलेले आहेत. आतापर्यंत सलग पाच वेळेस जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेले आणि प्रत्येकी दोन वेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहिलेले शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर हे जालना तालुक्यातील रेवगाव गटातून या वेळेसही उभे आहेत. ते शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे बंधू आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे नशीब आजमावीत आहेत. माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे यापूर्वी तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेले असून या वेळेस पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार अरिवद चव्हाण यांच्या पत्नी भाजपकडून लढत आहेत.

शिवसेनेवर टीका का टाळली?

राजूर येथे झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि खासदार दानवे यांनी शिवसेनेवर टीका करणे टाळले. परंतु शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि अन्य वक्त्यांनी दुसऱ्याच दिवशी खासदार दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन तालुक्यात अनेक जाहीर सभा घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले. मागील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या १६ तर शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी १५ जागा निवडून आल्या होत्या. या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला घनसावंगी, अंबड, बदनापूर, परतूर तालुक्यांमधून अधिक जागांची अपेक्षा आहे. आमदार राजेश टोपे यांनी त्यासाठी व्यूहरचना केलेली आहे. प्रथमच संपूर्ण जिल्हाभर उमेदवार उभे करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची बहुसंख्य ठिकाणी परस्परांशी तसेच राष्ट्रवादीशी लढत आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हय़ातील चारपकी तीन नगर परिषदांच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यापकी नगराध्यक्षपदाची एक निवडणूक काँग्रेसने खासदार दानवे यांच्या भोकरदनमधून जिंकलेली आहे तर दुसरी निवडणूक भाजपचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नींचा पराभव करून परतूरमध्ये जिंकलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अधिक यशाची अपेक्षा काँग्रेसला आहे.

जिल्हाध्यक्षांना अपेक्षा

जिल्हा परिषदेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला फारसे यश मिळाले नसले तरी या वेळेस मात्र ते मिळेल असा आशावाद या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केला आहे. मागील पंचवीस वर्षांत पाच वष्रे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आलेली शिवसेना या वेळेस क्रमांक एकचा पक्ष असेल आणि त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा तसेच व्यूहरचना करण्यात येत असल्याचे या पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले. बहुतेक ठिकाणी तिरंगी तर काही चौरंगी लढती होत आहेत. शिवसेना आणि भाजप परस्परांच्या विरोधात असल्यामुळे निकालाचे औत्सुक्य अधिक आहे. जालना जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.

आतापर्यंत युतीचे वर्चस्व!

मागील पाच निवडणुकींत चार वेळेस शिवसेना-भाजप युतीचे बहुमत होते. परंतु तरीही २००५ मध्ये भाजपच्या एका गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद हातातून गेले होते. तर २००७ मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद मिळविले होते. शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांचा जिल्हा परिषद राजकारणात १९९२ मध्ये प्रवेश झाला. पंचायत समिती उपसभापती ते दोनदा जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि दोनदा उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आले. एकत्रित काँग्रेस असताना १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पाच वष्रे कै. अंकुशराव टोपे गटाचे ज्ञानदेव बांगर अध्यक्षपदी राहिले. सध्याच्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असणारे राहुल लोणीकर या वेळेस पुन्हा उभे आहेत. सध्या राष्ट्रवादीकडून निवडून लढविणारे सतीश टोपे हेही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राहिलेले आहेत. भाजपचे राहुल लोणीकर यांच्याविरुद्ध सध्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे बळीराम कडपे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहिलेल्या आहेत.