महापालिका निवडणुकीत शिवसेनेलाच स्पष्ट बहुमत मिळेल, पण ते मिळाले नाही, तरी निवडणुकीनंतर भाजपशी कल्याण-डोंबिवलीच्या धर्तीवर समझोता करणार नाही, उलट भाजपला बाजूला ठेवून अन्य पक्षांच्या व अपक्षांच्या सहकार्याने सत्ता मिळविण्याचेच शिवसेनेचे मनसुबे राहतील, असे अप्रत्यक्ष संकेत आज उद्धव ठाकरे यांनी या विशेष मुलाखतीत दिले.
भाजपच्या पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ाचा खरपूस समाचार घेताना ठाकरे म्हणाले, आम्ही ११४ जागा भाजपल्या दिल्या असत्या, तर पारदर्शी ठरलो असतो. पण न दिल्याने आम्ही पारदर्शी नाही.’ आमचा कारभार पटत नव्हता, तर युतीच्या चर्चेसाठी प्रस्ताव घेऊन शिवसेनेकडे आलाच कशाला, असा सवाल ठाकरे यांनी केला. मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी आहेच, तेथे स्थायी समितीमध्ये प्रसिध्दीमाध्यमांना प्रवेश असून आयुक्त व अधिकाऱ्यांचे आदेश ऑनलाईन उपलब्ध आहेत.
आता राज्य सरकारनेच पारदर्शी कारभारासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रसिध्दीमाध्यमांना प्रवेश द्यावा, लोकायुक्त, विरोधी पक्षनेते यांना निमंत्रित करावे, म्हणजे मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणार नाहीत. राज्य सरकारचाच कारभार गोपनीय असून मुख्यमंत्री, मंत्री, सचिव आदी सर्व अधिकाऱ्यांचे आदेश आणि माहिती अधिकारातील अर्जाची वाट न पाहता या सर्वाचे शेरे असलेल्या फाईल्स जनतेसाठी खुल्या असाव्यात व ऑनलाईन उपलब्ध असाव्यात, अशी मागणी ठाकरे यांनी केली. केवळ मुंबई, पुण्यातील महापालिकेतील उमेदवारांनादरवर्षी उत्पन्न व मालमत्ता जाहीर करण्याची शपथ देण्याचे थोतांड भाजपने केले. पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि सर्वच महापालिकांमधील नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी हे सक्तीचे करुन भाजपने पारदर्शी कारभारासाठी आग्रही असल्याचे दाखवून द्यावे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे उवाच
- हार्दिक पटेलला ‘देशद्रोही’ ठरविणे चुकीचे
- विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविणार काय?
- मनकी बात नाही, मनमानी की बात सुरु आहे
- मोदींचा करिष्मा संपल्याने जाहीरनाम्यावर मोठे छायाचित्र न वापरता मुद्रांकाची गरज भासली
- मुख्यमंत्री चांगले, पण हुकूमाचे ताबेदार
- शिवसेनेने खंडणीवसुली कधी केली हे सिध्द करा
- औकात दाखविण्याची भाषा भाजपने आधी सुरु केली
- मोदींवर वैयक्तिक टीका मी केली नाही, धोरणांवर केली
‘दाऊदाचार्य’ भाजपच्या व्यासपीठावर बसतील
भाजपची नीतीमत्ता आता बदलली असून पप्पू कलानीच्या मुलाशी आघाडी, गुंडांना प्रवेश दिला जात आहे. पूर्वी भाजप नेत्यांबरोबर व्यासपीठावर बसताना शंकराचार्य, साधू-महंत असायचे. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कलानीला प्रचंड विरोध केला होता. दाऊदच्या मुसक्या बांधून आणण्याऐवजी आता भाजप नेते त्याला पक्षात घेऊन पावन करतील आणि ‘दाऊदाचार्य’ करुन व्यासपीठावर बसवितील. त्यामुळे आता मी अशा भाजप नेत्यांबरोबर एका व्यासपीठावर जाणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा नाही
शिवसेना भाजप युती तुटल्यावर २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना शिवसेनेची सत्ता आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करण्यात आले होते. पुढील विधानसभा निवडणुकीच्या वेळीही ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का, असे विचारता त्यावेळी अचानकपणे युती तुटून निवडणुका पुढे आल्याने तसा निर्णय घेतला होता, असे सांगितले. मला मुख्यमंत्रीपदाची वैयक्तिक महत्वाकांक्षा मुळीच नाही. पण पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणून दाखवीन, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. मध्यावधी निवडणुका होतील का किंवा हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार का, याबाबत थेट भाष्य करणे ठाकरे यांनी टाळले. आदित्य ठाकरे हे लोकसभेची निवडणूक लढविणार का, असे विचारता त्यास अजून वेळ असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
