गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पण भाजपा-मनसे युतीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. भाजपानं मनसेशी युती केल्यास, भाजपाचं नुकसान होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

रिपब्लिकन पक्ष भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून त्यांना मनसेशी युती करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच मनसेशी युती केल्यास उत्तर भारतीय, गुजराती आणि दक्षिणात्य लोकांची मतं मिळणार नाहीत, असं कारण आठवले यांनी सांगितलं आहे. ते आज कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खासगी कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा- “गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

भाजपा-मनसेच्या संभाव्य युतीबाबत भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेबरोबर युती करण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. गेल्यावेळी भाजपा आणि आरपीआयने एकत्र येत ८२ जागा निवडून आणल्या. त्यामुळे यावेळी २२७ जागांपैकी ११४ हून अधिक जागा निवडून आणण्यात आपल्याला काहीही अडचणी येणार नाही.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

“राज ठाकरे यांच्याशी युती केल्यास भाजपाचे नुकसान होऊ शकतं. मुंबईत उत्तर भारतीयांची मतं आहेत, गुजराती मतं आहेत, दक्षिणात्य नागरिकांची मतं आहेत. मनसेशी युती केल्यास आपल्याला ही मतं मिळणार नाहीत. त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, अशी माझी भूमिका आहे. रिपब्लिकन पक्ष भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.