Gold Rate Today : भारतीय महिला आणि सामान्य लोकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोनं. सोन्याचे दर वाढतात की कमी होतात? याकडे नेहमीच भारतीय सामान्य माणूस लक्ष ठेवून असतो. आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्याचे दर घसरले. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प आज सादर झाला. यावेळी सोन्यावरील सीमाशुल्क (कस्टम ड्युटी) कमी करण्यात आले. सीमाशुल्क कमी करताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळे दर असले तरी १० ग्रॅममागे चार हजार रुपयांनी सोने स्वस्त झाल्याचे कळते आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूवरील सीमाशुल्क घटविण्याचा निर्णय घेतला. “देशातील सोने आणि मौल्यवान धातूंच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवण्यासाठी मी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील ६.४ टक्के करण्याचा प्रस्ताव देते”, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्स आज सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा ७२,८३८ रुपये होता. अर्थसंकल्पात सीमाशुल्क ६ टक्क्यांवर आल्याचे कळताच बाजारात सोन्याची विक्री वाढली. एमसीएक्सवर सोन्याच्या विक्रीचा प्रति तोळा दर आता ६८,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हे वाचा >> बजेटमध्ये महाराष्ट्राच्या ताटात काय? फडणवीसांनी वाचली यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात जळगाव ही सुवर्ण नगरी मानली जाते. बाहेरच्या राज्यातूनही लोक याठिकाणी सोने विकत घेण्यासाठी येत असतात. जळगावमध्ये अर्थसंकल्प जाहीर होताच. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३ हजार रुपयांची घट झाली. यामुळे आता ग्राहकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जळगावमधील सराफा व्यावसायिकांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, सकाळी सोन्याचा दर ७३ हजार रुपये होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन तासांत सोन्याचा दर ७१ हजारावर आला. जळगाव मधील सराफा बाजारात दोन ते तीन हजार रुपयांची तात्काळ घसरण पाहायला मिळाली असली तरी कालांतराने देशभरात घसरण ४ हजारापर्यंत असल्याचे कळले.