Amazon Layoff News : गेल्या काही महिन्यांपासून अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीचा धडाका लावला आहे. या संदर्भात अनेकदा बातम्याही समोर आलेल्या आहेत. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढत असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. यातच आता ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा मोठी नोकर कपात करण्याच्या तयारीत आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनी त्यांच्या मानव संसाधन विभागातील (कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करणारा विभाग) १५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची कपात कमी करण्याच्या विचारात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फटका एचआर (HR) युनिटला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनच्या इतर भागांनाही फकटा बसू शकतो असं वृत्तात म्हटलं आहे.

वृत्तानुसार, यामध्ये प्रभावित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आणि ही कपात नेमकी कधी करणार? याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅमेझॉनने वेब सर्व्हिसेसमध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता कंपनी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

अ‍ॅमेझॉन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाउड ऑपरेशन्समध्ये अब्जावधी रुपये गुंतवत असल्याच्या कारणास्तव अशा प्रकारची कर्मचाऱ्यांची कपात करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंपनीने या वर्षी भांडवली गुंतवणुकीवर १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यातील बराचसा भाग अंतर्गत वापरासाठी आणि क्लायंटसाठी एआय पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी तथा डेटा सेंटर्स बांधण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, सीईओ अँडी जॅसी यांनी स्पष्ट केलं होतं की, नवीन युग एआयचं आहे. प्रत्येक कर्मचारी हा बदल करणार नाही. पण अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी एआय मोहिमेचा स्वीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. अँडी जॅसी यांनी म्हटलं होतं की, “जे लोक हा बदल स्वीकारतात, एआयमध्ये पारंगत होतात, अंतर्गतरित्या आमच्या एआय क्षमता तयार करण्यास आणि सुधारण्यास मदत करतात आणि ग्राहकांना सेवा देतात, ते चांगल्या स्थितीत असतील”, असं सूचक भाष्य त्यांनी केलं होतं.

“आम्हाला अपेक्षा आहे की यामुळे आमच्या एकूण कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल, कारण आम्हाला संपूर्ण कंपनीमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने कार्यक्षमता वाढेल”, असंही अँडी जॅसी यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अमेझॉनने २०२२ ते २०२३ दरम्यान मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट पदांची कपात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना अ‍ॅमेझॉन आखत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.