Indian Farmers Praises PM Modi’s Anti Tariff Stand: जुलैमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लादला आहे. याचबरोबर भारतातील शेती आणि दुग्ध उत्पादन बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यास केंद्र सरकारचा ठाम विरोध असल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादल्यामुळे दुग्ध उत्पादकांपासून ते मच्छिमारांपर्यंत या क्षेत्रांना आता मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नवीन टॅरिफमुळे या क्षेत्रांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मोठी किंमत मोजावी लागली तरी…

शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर लादल्या जाणाऱ्या या टॅरिफविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाम भूमिका घेतली. कृषी क्षेत्राचे समर्थन करताना, त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे हित “सर्वोच्च प्राधान्य राहील.” पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर प्रमुख शेतकरी संघटनांनी त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, त्यांना “वैयक्तिकरित्या खूप मोठी किंमत मोजावी लागली” तरी ते यासाठी तयार आहेत, पण ते शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाहीत.

या दाव्यांना पाठिंबा देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आणि अमेरिकन टॅरिफच्या दबावाला न जुमानता शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला.

शेतकऱ्यांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

शेतकरी-अनुकूल दृष्टिकोनाचे कौतुक करताना, भारतीय शेतकरी चौधरी चरण सिंह संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र चौधरी यांनी शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही या दूरदर्शी आणि शेतकरी-अनुकूल दृष्टिकोनाचे मनापासून स्वागत आणि समर्थन करतो.”

कोणतीही परदेशी शक्ती…

छत्तीसगड युवा प्रगतीशील शेतकरी संघटनेचे वीरेंद्र लोहान, धर्मेंद्र मलिक, किर्पा सिंग नथ्थुवाला, कुलदीप सिंग बाजीदपूर आणि इतर अनेक नेत्यांनी चौधरी यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि “कोणतीही परदेशी शक्ती” देशावर नियंत्रण ठेवू शकत नाही असे मत व्यक्त केले. त्यांनी मुक्त व्यापाराबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्यात बदल करू नये असे आवाहन केले.

“भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अमेरिकेच्या दबावाबद्दल आम्हाला खूप चिंता वाटत होती. जर तो करार झाला असता तर शेतकरी उद्ध्वस्त झाला असता”, असे नथ्थुवाला यांनी नमूद केले आणि दावा केला की देशातील शेतकरी पंतप्रधान मोदी आणि कृषी मंत्रालयाच्या पाठीशी उभे आहेत.