पुणे : देशातील निवासी बांधकाम बाजारपेठेत परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राला करोना संकटाच्या काळात बसलेल्या फटक्यातून, अद्याप ते सावरू शकलेले नाही. मागील दोन वर्षात व्याजदरवाढीमुळे परवडणाऱ्या घरांच्या कर्जाचे मासिक हप्ते (ईएमआय) सुमारे २० टक्क्यांनी वाढले असून, ग्राहकही खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या मागणीसोबत त्यांचा पुरवठाही कमी झाला आहे.
स्थावर मालमत्ता सेवा व सल्लागार कंपनी ‘अनारॉक’च्या अहवालानुसार, करोना संकटानंतर परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात घसरणक्रम सुरू झाली. त्यानंतर मागील दोन वर्षांत परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट झाली आहे. मागणीत घट झाल्याने विकसकांकडून अशा घरांचा पुरवठाही कमी झाला आहे. पहिल्या सहामाहीत एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांची संख्या २० टक्क्यांवर आली आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीच्या तुलनेत त्यात ११ टक्के घसरण झाली आहे. देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एकूण घरांच्या पुरवठ्यात परवडणाऱ्या घरांचा संख्या पहिल्या सहामाहीत १८ टक्क्यांवर आली. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ती २३ टक्के होती.
मागील दोन वर्षांत व्याजदरात वाढ झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका परवडणारी घरे घेणाऱ्या ग्राहकांना बसला आहे. सुमारे ३० लाख रुपयांचे गृहकर्ज असेल तर २०२१ मध्ये ६.७ टक्के व्याजदरानुसार मासिक हप्ता २२ हजार ७०० रुपये होता आणि आता व्याजदर ९.१५ टक्क्यांवर जाऊन तो २७ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. मासिक हप्त्यात ४ हजार ६०० रुपये म्हणजेच २० टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर आता एकूण कर्जापेक्षा व्याजाची रक्कम जास्त झाली आहे.
सध्या गृह कर्जाचे व्याजदर ९.१५ टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यामुळे २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाखांचे गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीला मासिक हप्ता २७ हजार ३०० रुपये बसत आहे. त्यामुळे त्याच्या कर्जफेडीत एकूण व्याज रक्कम ३५.५ लाख रुपयांवर पोहोचणार आहे.- प्रशांत ठाकूर, विभागीय संचालक, अनारॉक