मुंबई : रिझर्व्ह बँकेने वितरणांतून काढून टाकलेल्या २,००० रुपयांच्या सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे सोमवारी मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली गेली होती. नंतर ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.

हेही वाचा >>> विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

रिझर्व्ह बँकेने नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा ज्या दिवशी केली त्या १९ मे २०२३ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. तर २९ मार्च २०२४ रोजी कामकाज समाप्तीच्या वेळी अद्याप लोकांहाती असलेल्या या नोटांचे मूल्य ८,२०२ कोटी रुपयांवर घसरल्याचे रिझर्व्ह बँकेने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आजही बदलून घेणे शक्य

देशभरातील १९ रिझर्व्ह बँक कार्यालयांमध्ये आजही २,००० रुपयांच्या नोटा जमा लोकांना जमा करून, बदलून घेता येऊ शकतात. लोकांना दोन हजारांच्या नोटा भारतातील त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी कोणत्याही भारतीय टपाल विभागाच्या कोणत्याही कार्यालयांमधून कोणत्याही रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला पोस्टाद्वारे देखील पाठवता येऊ शकतात.

बँक नोटा जमा/बदली करून देणारी १९ रिझर्व्ह बँक कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम अशी आहेत.