लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल अर्थात ‘एमएससीआय’ने अदानी समूहातील अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या दोन कंपन्यांना ‘एमएससीआय इंडिया’ निर्देशांकातून वगळण्याची घोषणा केली आहे.

‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा संशोधन अहवाल आणि त्यातील हेराफेरी आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे समूहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाला, २४ जानेवारीपासून जवळपास १२,००० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे. ‘एमएससीआय’च्या ताज्या पवित्र्यानंतर शुक्रवारी भांडवली बाजारात अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या समभागांना मोठ्या घसरणीने पुन्हा वेढले. मुंबई शेअर बाजारात अदानी टोटल गॅसचा समभाग ४.३३ टक्के म्हणजे ३७ रुपयांनी घसरून ८१८.३५ रुपयांवर बंद झाला. तर अदानी ट्रान्समिशनच्या समभागात ३.५४ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ३२ रुपयांच्या घसरणीसह ८८५ रुपयांवर बंद झाला.

कोणत्या कंपन्यांचा नव्याने समावेश?

‘एमएससीआय इंडिया’ निर्देशांकातून तीन कंपन्यांना वगळण्यात तर तीन कंपन्यांचा नव्याने समावेश करण्यात येणार आहे. नवीन बदल येत्या ३१ मेपासून प्रत्यक्षात येणार आहे. अदानी समूहातील दोन कंपन्यांबरोबर इंडस टॉवर्सला देखील यातून वगळण्यात येणार आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांक पुनरावलोकनानुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन या तीन कंपन्यांचा नव्याने समावेश केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एमएससीआय’ म्हणजे काय?

जागतिक मान्यतेची गुंतवणूक व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्ले यांच्या मालकीची मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल अर्थात ‘एमएससीआय’ ही एक कंपनी आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूक समुदायासाठी समभागांवर आधारित निर्देशांक आणि संलग्न सेवा प्रदान करणारी ही प्रतिष्ठित कंपनी आहे. ठरावीक कालावधीत बाजारभाव किंवा अन्य मापनीय चलांत होणाऱ्या बदलांची सर्वसाधारण पातळी अजमावण्याचे गमक म्हणजे निर्देशांक होय. अशा जगभरात वापरात येणाऱ्या निर्देशांकांची बांधणी, त्याचबरोबर या निर्देशांकांचे देखभाल, निगराणीचे कार्यदेखील ‘एमएससीआय’कडून पार पाडले जाते. भारताच्या भांडवली बाजाराला व्यापणाऱ्या ११३ कंपन्यांना ‘एमएससीआय इंडिया निर्देशांका’त स्थान आहे.