नवी दिल्ली : मागणीच्या परिस्थितीत सुरू असलेली सुधारणा, नवीन व्यवसायातील वाढ आणि रोजगार निर्मितीच्या आघाडीवर सुधारलेले चित्र असूनही भारताच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये घट दिसून आली, असे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले. नवीन कार्यादेश आणि उत्पादनांतील घसरणीमुळे वाढीचा वेगाला मर्यादा घातली.

हेही वाचा >>> खासगी बँकांतील तेजीने ‘सेन्सेक्स’ची शतकी कमाई

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक नोव्हेंबर महिन्यात ५८.४ गुणांवर नोंदला गेला. त्याआधीच्या म्हणजेच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तो ५८.५ गुणांवर होता. मात्र ५९.२ गुणांच्या प्राथमिक अंदाजापेक्षा तो कमी राहिला. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास कार्य-व्यवहारात विस्तार दर्शविला जातो, तर त्यात ५० गुणांच्या खाली घसरण आकुंचनाचा निदर्शक मानली जाते.

हेही वाचा >>> मिडकॅप फंडातील ‘एसआयपी’तून परतावा २२ टक्क्यांपर्यंत

भारतातून सेवांसाठी आंतरराष्ट्रीय मागणी सुधारत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवीन निर्यात कार्यादेश गेल्या तीन महिन्यांत सर्वात जलद दराने वाढले आहेत. मुख्यतः आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेतील ग्राहकांकडून कंपन्यांनी नफा नोंदविला आहे. ही बाब या क्षेत्रातील व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. त्याच वेळी, अन्नधान्यातील उच्च चलनवाढ आणि वाढत्या वेतन खर्चामुळे सेवांच्या किमती महागल्या आहेत, असे मत एचएसबीसी इंडियाच्या मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजगाराची स्थिती दोन दशकांत सर्वोत्तम

नवीन व्यवसायाला सामावून घेण्याच्या उद्देशाने सेवा कंपन्यांनी भरती मोहिमेद्वारे त्यांची कार्यक्षमता वाढवणे सुरू ठेवले. सर्वेक्षणानुसार, नोव्हेंबरमध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या नोकरदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्ष २००५ मध्ये सर्वेक्षण सुरू झाल्यापासून सेवा क्षेत्रातील रोजगार सर्वात वेगाने वाढला आहे.