मुंबईः भारतातून २०१५ ते २०२५ या दशकभरात ई-कॉमर्स निर्यातीचा २० अब्ज डॉलरचा टप्पा पार केल्याची घोषणा ॲमेझॉनने सोमवारी केली. जागतिक विक्री कार्यक्रमांतर्गत या कंपनीने २०३० पर्यंत ८० अब्ज डॉलरच्या ई-कॉमर्स निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.
गेल्या दशकभरात ॲमेझॉनच्या माध्यमातून भारतीय निर्यातदारांनी ७५ कोटी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांची विक्री जगभरातील ग्राहकांना केली आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन ग्लोबल सेलिंग इंडियाचे प्रमुख श्रीनिधी कलवापुडी यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या ई-कॉमर्स मंचाच्या माध्यमातून लाखो भारतीय विक्रेत्यांनी २०१५ ते २०२५ या कालावधीत २० अब्ज डॉलरच्या निर्यातीचा टप्पा पार केला आहे. ही निर्यात २०३० पर्यंत ८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
अमेरिका आणि भारतामध्ये सध्या व्यापार आणि अतिरिक्त आयात शुल्कावरून वाद सुरू आहे. अमेरिका ही भारतासाठी सर्वांत मोठी निर्यात बाजारपेठ आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन ग्लोबल सेलिंग इंडियाचे प्रमुख श्रीनिधी कलवापुडी यांनी स्पष्ट केले की, आयात शुल्काचा मुद्दा आमच्या नियंत्रणाच्या बाहेर असल्याने आमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर आम्ही भर देत आहोत. आम्ही केवळ १, २ अथवा ५ वर्षांचा विचार करीत नाही तर पुढील भविष्याचा विचार करीत आहोत आणि त्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. भारताची ताकद ही रचनात्मक आहे, ती चक्रीय अडथळे तिला बाधक ठरणार नाहीत.
२०२० मध्ये, ॲमेझॉनने २०२५ पर्यंत भारतातून १० अब्ज डॉलरची एकत्रित ई-कॉमर्स निर्यात साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जे नंतर त्याच कालावधीत २० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यात आले आणि आता प्रत्यक्षात साध्यही केले गेले.
लघुउद्योगांचा वाटा अधिक
ॲमेझॉनने तिच्याकडे नोंदणीकृत छोट्या निर्यातदारांची संख्या एक वर्षात ३३ टक्क्यांच्या दमदार वाढीसह २ लाखांवर नेली आहे. त्यात स्वयंउद्योजक आणि लघुउद्योगांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत ॲमेझॉनच्या माध्यमातून निर्यात करणारे विक्रेते जास्त असून, अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन या देशांतील ग्राहक त्यांना मिळविता आले आहेत.
