पुणे : भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद न्यायप्रविष्ट असून, आता कंपनीचे संस्थापक नीलकंठ कल्याणी यांचे नातू समीर हिरेमठ आणि नात पल्लवी स्वादी यांनी मामा बाबा कल्याणी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यांनी भारत फोर्ज आणि कल्याणी स्टील कंपनीतील वाटा, तसेच कौटुंबिक संपत्तीतील नववा हिस्सा मागितला आहे.

हेही वाचा >>> घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री

समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यात त्यांची आई सुगंधा हिरेमठ, भाऊ गौरीशंकर कल्याणी, त्यांची मुले शीतल आणि विराज कल्याणी आणि बाबा यांचे पुत्र,  समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्यांना प्रतिवादी केले आहे. कल्याणी समूहातील कंपन्यांचे बाजारमूल्य जवळपास ६२ हजार ८३४ कोटी रुपये आहे. कल्याणी कुटुंबीयांच्या नावे पुणे, महाबळेश्वरसह राज्यातील अन्य भागात असलेल्या जमिनींची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. ही सर्व संपत्ती हिंदू अविभक्त कुटुंब कायद्यांतर्गत असून, त्यातूनच सर्व उद्योग आणि गुंतवणूक चालविण्यात येत आहे. त्यामुळे या संपत्तीवर केवळ बाबा कल्याणी यांचा अधिकार नाही, असे समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.  

प्रतिमा मलीन करण्याचाच यत्न  

बाबा कल्याणी आणि त्यांचे कुटुंब आणि उद्योगसमूहाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने याचिकाकर्त्यांनी चुकीचे आणि निराधार दावे केले आहे. हे निराधार दावे नाकारतो, असे निवेदन भारत फोर्जच्या प्रवक्त्यांनी दिले आहे. याचिकाकर्त्यांनी २० मार्च रोजी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला. तो प्रतिवादींना देण्यापूर्वी, तसेच प्रकरण सुनावणीसाठी दाखल होण्यापूर्वीच दाव्याची प्रत  माध्यमांना देणे धक्कादायक आहे. त्यातून याचिकार्त्यांचा द्वेषयुक्त हेतू दिसून येतो. याविरोधात न्यायालयात भूमिका मांडण्यात येईल, मानहानीबाबत योग्य ती दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.