पुणे: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रला (महाबँक) डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १ हजार ४०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या नफ्यात ३६ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, बँकेच्या व्याज उत्पन्नातही वाढ झाली आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाबँकेचे तिमाही आर्थिक निकाल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निधू सक्सेना, कार्यकारी संचालक आशिष पांडे आणि रोहित ऋषी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. महाबँकेला गेल्या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत १,०३६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात ३५.८२ टक्के वाढ होऊन तो १,४०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?

बँकेला तिसऱ्या तिमाहीत ७,११२ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते ५,८५१ कोटी रुपये होते. बँकेने तिसऱ्या तिमाहीत ६,३२५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळविले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते ५,१७१ कोटी रुपये होते. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांमध्ये (ग्रॉस एनपीए) घट होऊन ते १.८० टक्क्यांवर घसरले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते २.०४ टक्के होते. याचवेळी तिसऱ्या तिमाहीत निव्वळ बुडीत कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.२ टक्क्यांवर घसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअरच्या भावात वाढ

बँक ऑफ महाराष्ट्रचा समभाग गुरुवारी मुंबई शेअर बाजारात १.९४ टक्क्यांची वाढ होऊन, ५१.९८ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला.