मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे राखल्याने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्याचे सकारात्मक पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले आणि प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारच्या सत्रात १ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८९.५७ अंशांनी वधारून ६४,०८०.९० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६११.३१ अंशांची मजल मारत ६४,२०२.६४ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १४४.१० अंशांची भर घातली आणि तो १९,१३३.२५ अंशांवर विसावला.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम दिल्याने जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले. अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर कमी झाल्याने हे व्याजदर वाढीला दीर्घ विराम मिळण्याचे संकेत देतात. तसेच वस्तू आणि सेवाकराचे वाढलेले संकलन, वाहन विक्रीने घेतलेला वेग आणि दुसऱ्या तिमाहीतील समाधानकारक आर्थिक कामगिरीमुळे देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक चित्र आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्स इंडसइंड बँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि अॅक्सिस बँकचे समभाग सर्वाधिक वधारले. तर टेक महिंद्र आणि बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,८१६.९१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ६४,०८०.९० +४८९.५७ (०.७७)
निफ्टी १९,१३३.२५ +१४४.१० (०.७६)
डॉलर ८३.२६ -२
तेल ८६.१२ +१.६७