मुंबई : इराण-इस्रायलमधील युद्धबंदीतून आखातातील तणाव निवळल्याची चिन्हे आणि त्या परिणामी जागतिक बाजारातील तेजीमुळे स्थानिक बाजारालाही बुधवारी खुलविले आणि प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १ टक्क्यांची वाढ झाली.बुधवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७००.४० अंशांनी वाढून ८२,७५५.५१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७६०.८ अंशांची कमाई करत ८२,८१५.९१ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २००.४० अंशांची कमाई केली आणि तो २५,२४४.७५ पातळीवर बंद झाला.

आखातातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि खनिज तेलाच्या किमती नरमल्या आहेत. भारतीय शेअर बाजारात याच कारणाने चैतन्याचे वातावरण आहे. सकारात्मक जागतिक संकेताने गती टिकवून ठेवण्यास बाजाराला मदत केली. देशांतर्गत आघाडीवर, अनुकूल मान्सूनचा अंदाज आणि महागाई नियंत्रणात असल्याने आशावाद आणखी दृढ होत आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये, टायटन, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्र बँक आणि अॅक्सिस बँकेची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,२६६.०१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,२०९.६० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

बाजारातील तेजीची कारणे काय?

१. इस्रायल-इराण संघर्ष विराम: युद्धबंदी घोषणेमुळे जागतिक स्तरावर बाजारातील चिंता कमी झाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना केलेल्या आवाहनानंतर कोणत्याही उल्लंघनाच्या बातम्या नसणे गुंतवणूकदारांसाठी उत्साहदायी ठरले.

२. देशांतर्गत मूलभूत गोष्टींकडे लक्ष: भू-राजकीय ताण निवळल्यामुळे, गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत मूलभूत गोष्टींकडे वळले आहे. भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ मध्ये ६ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. समाधानकारक मान्सूनमुळे अन्नधान्य महागाई दर कमी राहण्याची आशा आहे.

३. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून आधार: देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात समभाग खरेदीचा जोर कायम राखला आहे, देशी गुंतवणूकदार संस्थांनी जून महिन्यात (२४ तारखेपर्यंत) ६७,५८७.६७ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.

४. खनिज तेलाच्या किमती स्थिर: तेलाच्या स्थिर किमती आणि डॉलर निर्देशांकातील घसरणीने रुपयाला बळ मिळाले. डॉलर निर्देशांक १०० च्या खाली व्यवहार करत आहे, ज्यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परकीय भांडवलाचा प्रवाह वाढण्याची शक्यता वाढते.

सेन्सेक्स ८२,७५५.५१ ७००.४० (०.८५%)

निफ्टी २५,२४४.७५ २००.४० (०.८०%)

तेल ६७.९५ -१.२१%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८६.००७ २ पैसे