मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पुन्हा सुरू झालेली समभाग खरेदी आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना मागणीमुळे गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. आयटी कंपन्या आणि ब्लू-चिप रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जोरावर सेन्सेक्स ३९८ अंशांनी वाढला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३९८.४४ अंशांनी वधारून, ८२,१७२.१० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४७४.०७ अंशांची कमाई करत ८२,२४७.७३ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो २५,१८१.८० पातळीवर बंद झाला.

दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या सकारात्मक कामगिरीच्या आशेने आणि धातू निर्देशांकांनी चांगली कामगिरी केल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण होते. वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्र यांसारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांची चाल मंदावण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे. मात्र वस्तू आणि सेवाकराचा बोजा कमी झाल्याने देशांतर्गत मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. कमाईच्या अपेक्षा मंदावल्या असूनही, गुंतवणूकदारांनी आकर्षक मूल्यांकनांमुळे समभाग खरेदीचा जोर कायम ठेवला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्तीच्या संकेतांमुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी निर्देशांक सकारात्मक राहिला, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

कुठे तेजी, कुठे घसरण?

एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्र सारख्या आयटी समभागांमध्ये तिमाही निकालापूर्वी वाढ झाली. सेन्सेक्समध्ये, टाटा स्टीलचा समभाग २.६५ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सन फार्मा आणि टीसीएसचे समभाग तेजीसह स्थिरावले. तर ॲक्सिस बँक, टायटन, मारुती आणि टाटा मोटर्सच्या समभागांनी मात्र निराशा केली.

सेन्सेक्स ८२,१७२.१० ३९८.४४ ( ०.४९%)

निफ्टी २५,१८१.८० १३५.६५ ( ०.५४%)

तेल ६६.०८ -०.२३%

डॉलर ८८.७९ ४ पैसे