मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कॅनरा बँकेला सरलेल्या जून तिमाहीत ४,७५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, त्यात २२ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या बँकेने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ३,९०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

आर्थिक वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कॅनरा बँकेचे एकूण उत्पन्न ३८,०६३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष २०२५ च्या याच तिमाहीत ३४,०२० कोटी रुपयांवर मर्यादित होते.

बँकेने मिळवलेले व्याज आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत २८,७०१ कोटी रुपयांच्या तुलनेत ३१,००३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत, बँकेचा कार्यकारी नफा वाढून ८,५५४ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ७,६१६ कोटी रुपये होता.
बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे.

मुख्यतः जून तिमाहीच्या अखेरीस अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) एकूण कर्जाच्या २.६९ टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. गेल्या वर्षी एनपीए ४.१४ टक्के नोंदवला गेला होता. त्याचप्रमाणे, निव्वळ बुडीत कर्जे ०.६३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १.२४ टक्के नोंदवले गेले होते. परिणामी, पहिल्या तिमाहीत तरतुदी आणि आकस्मिक निधी १,८४५ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २,१७१ कोटी रुपये होता. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआर) ८९.२२ टक्क्यांवरून ९३.१७ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. त्याच वेळी, जून २०२५ मध्ये मालमत्तेवरील परतावा (आरओए) १.१४ टक्क्यांपर्यंत वाढला, जो जून २०२४ मध्ये १.०५ टक्के होता. तर बँकेचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर १६.५२ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समभागाची कामगिरी कशी?

गुरुवारच्या सत्रात कॅनरा बँकेच्या समभागाने ५ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. मुंबई शेअर बाजारात समभागाने गुरुवारच्या सत्रात ११४ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. दिवसअखेर कॅनरा बँकेचा समभाग ५.७० रुपयांनी वधारून ११३.५० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे १,०२,९५१ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. कॅनरा बँकेच्या समभागाने वर्षभरात १३.३३ टक्के तर तीन महिन्यात १४.३० टक्के परतावा दिला आहे.