कमी झालेले वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीचे दर आणि परिणामी वाढलेल्या मागणीमुळे वाहन निर्मिती कंपन्या दिवाळी आधीच विक्रीतील आतषबाजीचा अनुभव मंगळवारी घेतला.
देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने त्यांच्या विविध श्रेणीतील वाहनांसाठी ८०,००० चौकशी नोंदवल्या आणि अंदाजे ३०,००० वाहनांची ग्राहकांना रवानगी देखील केली, तर ह्युंदाईने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोमवारी ११,००० वाहनांची विक्री नोंदवली. मुख्यतः नवरात्रीचा उत्सव आणि जीएसटीतील दर कपातीमुळे वाहन निर्मिती कंपन्यांचा उत्साह वाढवला आहे.
पितृपक्षाच्या समाप्तीपासून दिवाळीपर्यंतचा कालावधी हा विक्रीचा सर्वोच्च काळ मानला जातो. तसेच, सोमवारी, छोटी प्रवासी वाहने आणि एसयूव्हीवरील जीएसटी २८ टक्क्यावरून थेट १८ टक्क्यांनापर्यंत कमी केल्यामुळे वाहनांची मागणी वाढली आहे.
ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असून गेल्या ३५ वर्षात कधीही अशी मागणी पाहिली नाही. पहिल्याच दिवशी ८०,००० खरेदी उत्सुक चौकशी नोंदवल्या गेल्या आणि २५,००० हून अधिक मोटारी ग्राहकांना पोहचत्या केल्या गेल्या. आणखी पाच हजार वाहने सुपूर्द केली जाणार आहेत, असे मारुती सुझुकीचे विपणन आणि विक्रीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले. तर जीएसटी २.० सुधारणांमुळे बाजारात सकारात्मकता निर्माण झाली आहे, असे ह्युंदाई मोटर इंडियाचे पूर्णवेळ संचालक तरुण गर्ग म्हणाले.
टाटा मोटर्सने देखील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुमारे १०,००० गाड्यांची विक्री केली. देशभरातील त्यांच्या वितरकांकडे २५,००० हून अधिक ग्राहकांकडून खरेदी संबंधाने विचारणा नोंदविल्या गेल्या. ग्राहकांकडून विविध वाहनांच्या चौकशीमध्ये वाढ झाली असून त्यांच्याकडून आगाऊ नोंदणी देखील केली जात आहे. किमती कमी झाल्यामुळे वाहनांची नोंदणी वाढत आहे. उत्सवाच्या काळात सगळयांना वाहन खरेदी करता यावी यासाठी कामाचे तास वाढवले आहेत, असे टाटा मोटर्स प्रवासी वाहन विभागाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अमित कामत म्हणाले.
अडीच महिन्यांत २ लाख विक्रीचे लक्ष्य
मजबूत मागणी देशांतर्गत प्रवासी वाहन उद्योगासाठी दिलासा देणारी आहे. विशेषतः अलिकडच्या काही महिन्यांत हे क्षेत्र कमकुवत विक्रीशी झुंजत होते. या आर्थिक वर्षात वाहन क्षेत्राची विक्री मंदावत जाऊन जवळजवळ स्थिर आहे. वर्षाच्या सुरुवातीला १ ते ४ टक्क्यांच्या श्रेणीत वार्षिक वाढ अपेक्षित होती. मात्र, अलिकडच्या जीएसटी कपातीमुळे ती आता ५-७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात, एस अँड पी ग्लोबल मोबिलिटीने देशांतर्गत प्रवासी वाहन उद्योगासाठी २०२६ चा वाढीचा अंदाज ४.१ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नवीन वर्षात रस्त्यावर आणखी दोन लाख वाहनांची भर पडण्याची अपेक्षा आहे.
समभागांच्या वाढीला वेग
मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडियाने विक्रमी विक्री नोंदवली. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या समभागांवर दिसून आले. अशोक लेलँडचा समभाग ३.४१ टक्क्यांनी, टायर निर्माता एमआरएफ २.०८ टक्क्यांनी, मारुती १.८३ टक्क्यांनी, महिंद्र अँड महिंद्र ०.८९ टक्क्यांनी, टाटा मोटर्स ०.७८ टक्क्यांनी, आयशर मोटर्स ०.५७ टक्के, अपोलो टायर्स ०.२८ टक्के आणि ह्युंदाई मोटर इंडियाचे समभाग ०.०८ टक्क्यांनी वधारले. मारुती आणि एमआरएफनेही ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. परिणामी बीएसई ऑटो निर्देशांक ०.६१ टक्क्यांनी वाढून ६१,०२८.३८ वर पोहोचला.