मुंबई : विद्यमान २०२५ मधील प्राथमिक बाजारातील बाजारातील पहिल्या सहामाहीतील धीम्या सुरुवातीनंतर निधी उभारणीने वेग घेतला आहे. परिणामी सिटीबँक इंडियाला भांडवली बाजारातील व्यवसायासाठी मजबूत वर्ष अपेक्षित आहे, असे सिटीबँकेचे भारतातील प्रमुख के. बालसुब्रमण्यम यांनी सोमवारी एका मुलाखतीत सांगितले.
देशांतर्गत भांडवली बाजारात अनेक कंपन्यांनी निधी उभारणीसाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला आहे. २०२४-२५ मध्ये आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी १.७० लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. यंदा त्याहून अधिक निधी उभारणी होणे अपेक्षित आहे, असे बालसुब्रमण्यम म्हणाले.
वाढत्या संधी हेरण्यासाठी सिटी बँकेने गेल्या वर्षभरात भारतातील गुंतवणूक बँकिंग संघाची संख्या २८ वरून ३८ पर्यंत वाढवली आहे. चालू वर्षात टाटा कॅपिटल, पाइन लॅब्स, वीवर्क इंडिया आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया यासारख्या बड्या कंपन्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून बाजारपेठेला धडक देण्याची योजना आखत आहेत. बरोबरच जागतिक पातळीवरील काही नवउद्यमी भारतातील वाढत्या व्यवसाय वाढीचा फायदा मिळवण्यासाठी ‘आयपीओ’ची योजना आखत आहेत, असे बालसुब्रमण्यम म्हणाले.
वर्ष २०२३ मध्ये रिटेल बँकिंग व्यवसायातून माघार घेतल्यापासून सिटी बँकेच्या भारतातील व्यवसायाचा केंद्रबिंदू संस्थात्मक आणि गुंतवणूक बँकिंग हे राहिले आहे. मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा करोत्तर नफा ६१.९३ अब्ज रुपायंवर पोहोचला आहे. याच कालावधीत महसूल २८ टक्क्यांनी वाढून २२१.७३ अब्ज रुपये झाला आहे.