पीटीआय, नवी दिल्ली : वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत केंद्र सरकारकडून १५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे ३,०५२.५ रूपयांनी म्हणजेच ३.३ टक्क्यांनी बुधवारी वाढ करण्यात आली.
तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत १५.५० रूपयांनी कपात केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,५९५.५० रुपये (दिल्ली) झाली आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,५४७ रुपये आहे. व्यावसायिक एलपीजीच्या दरात सलग पाच कपातीनंतर ही वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर मात्र ८५३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे. एप्रिलमध्ये घरगुती एलपीजीच्या किमतीत ५० रूपयांनी वाढ करण्यात आली होती.
यासोबतच विमानाच्या इंधनाचे दर मुंबई मध्ये दर किलोलिटरमागे ८४,८३२.८३ रुपयांवरून ८७,७१४.३९ रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरमागे ३,०५२.५ रुपयांनी म्हणजेच ३.३ टक्क्यांनी वधारून ९३,७६६.०२ रुपयांवर पोहोचले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात १.४ टक्के (१,३०८.४१ रुपये प्रति किलोलिटर) कपात करण्यात आल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे विमान कंपन्यांचा कार्यचालन खर्च वाढला होता. एटीएफच्या किमतीत झालेली वाढ ही भू-राजकीय तणाव आणि व्यापार युद्धांनंतर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीशी सुसंगत आहे. या वाढीमुळे व्यावसायिक विमान कंपन्यांवर भार वाढेल. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. यामुळे विमानाचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.