पीटीआय, नवी दिल्ली

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी ग्राहकांनी सोने खरेदीचा योग साधला. देशभरातील सराफा बाजारात सकाळपासूनच गर्दीचे चित्र होते. यामुळे उलाढालीत मोठी वाढ झाली. दरम्यान, पाडव्याच्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावातील झळाळी कायम राहून ते उच्चांकी पातळीवर पोहोचले.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात तेजी सुरू आहे. ही तेजी पाडव्याच्या दिवशीही कायम राहिली. मुंबईतील सराफा बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ७१ हजार ८३२ रुपयांवर पोहोचला. याचवेळी २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ६५ हजार ७९८ रुपयांवर गेला. पुण्यातील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला २४ कॅरेटसाठी ७१ हजार ७०० रुपये आणि २२ कॅरेटसाठी ६५ हजार ९६० रुपयांवर पोहोचला.

हेही वाचा >>>‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सवर सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅमला १४० रुपयांची वाढ होऊन तो ७१ हजार ८४० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावातही प्रति किलोला ५०० रुपयांची वाढ होऊन तो ८४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. जागतिक धातू वायदे मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस १४ डॉलरने वाढून २ हजार ३५० डॉलरवर पोहोचला. याचवेळी चांदीचा भाव वधारून प्रतिऔंस २८.०४ डॉलरवर गेला, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिली.

ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आमच्या दालनांमध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. दागिन्यांच्या किमतींमुळे उत्साह कमी झालेला दिसला नाही. ग्राहकांनी लग्न समारंभ, गुंतवणुकीसाठी आणि रोजच्या वापरासाठी दागिन्यांची खरेदी केली . सर्व श्रेणी आणि प्रकारांमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्स अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत सोन्याचा दर हा वाढलेला असला तरी मुहूर्ताची सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दुपारनंतर वाढली आणि ती रात्रीपर्यंत होती. सोन्याच्या दरात सातत्याने झालेल्या वाढीमुळे ग्राहकांनी आपल्या बजेटनुसार सोने खरेदी केले. सोन्याचा दर चढ असल्यामुळे ग्राहकांकडून प्रामुख्याने लाईट वेट व डायमंडच्या दागिन्यांना मागणी होती. तसेच, आम्ही पारंपरिक दागिने कमी वजनात नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद होता. बाजारात ॲडव्हान्स बुकिंग फारसे नव्हते. सोन्याचे वाढते भाव लक्षात घेऊन आम्ही गार्गी ब्रँड अंतर्गत १४ कॅरेट गोल्डमध्ये नॅचरल डायमंडचे दागिने उपलब्ध करून दिले आहेत.-आदित्य मोडक, सीएफओ, पीएनजी सन्