scorecardresearch

तुमच्याकडे पेटीएमचा शेअर आहे? शेअरची घसरण थांबवण्यासाठी कंपनी करतेय ‘हे’ प्रयत्न.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात समभाग ६.४३ टक्क्यांनी म्हणजेच ३७.२५ रुपयांनी घसरून ५४२.३५ रुपयांवर स्थिरावला.

तुमच्याकडे पेटीएमचा शेअर आहे? शेअरची घसरण थांबवण्यासाठी कंपनी करतेय ‘हे’ प्रयत्न.
पेटीएमच्या शेअरमध्ये ६.२६ टक्के घसरण; शेअरला सावरण्यासाठी कंपनी काय करतेय? ( संग्रहित छायाचित्र )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : चीनमधील अलिबाबा समूहाने भारतीय डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील ३.१ टक्के हिस्सेदारी कमी केली आहे. गुरुवारच्या सत्रात अलिबाबा समूहाने त्यांच्याकडील ६.२६ टक्के हिस्सेदारीपैकी ३.१ टक्के समभाग ५३६.२५ रुपये प्रति समभाग या दराने विकले.

ब्लॉक डीलच्या माध्यमातून अलिबाबा समूहाने समभागांची विक्री केल्याने पेटीएमच्या समभागात गुरुवारी जवळपास ८.८ टक्क्यांनी घसरण दिसून आली. परिणामी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य ३५,२७१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात समभाग ६.४३ टक्क्यांनी म्हणजेच ३७.२५ रुपयांनी घसरून ५४२.३५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात तो ५२८.३५ रुपयांवर गडगडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये जपानस्थित सॉफ्टबँकने खुल्या बाजारात एकगठ्ठा (ब्लॉक डील) समभाग विक्रीतून कंपनीतील ४.५ टक्के हिस्सेदारी सुमारे १,६२७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात कमी केली. त्यावेळी देखील कंपनीच्या समभागात ११ टक्क्यांची घसरण झाली होती. सॉफ्टबँक आणि पेटीएमसारख्या बड्या गुंतवणूकदारांनी पाठ फिरवून समभाग विक्रीचे पाऊल टाकल्याचा एकंदर गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला. त्यातून एकूण समभाग घसरणीला आणखी हातभार लावला.

हेही वाचा… विश्लेषण : पेटीएमच्या समभागांत घसरण-कळा सुरूच… कारणे काय?

अलिबाबा समूहाने हिस्सेदारी निम्म्यावर आणली असली तरी अलिबाबा समूहातील अँट फायनान्शिअलने पेटीएममधील आपली २५ टक्के हिस्सेदारी कायम ठेवली आहे.

पडझडीतून सावरण्यासाठी कंपनीची योजना काय?

सतत सुरू असलेली घसरण थांबविण्यासाठी आणि प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून मोठ्या किमतीला समभाग मिळविलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी पेटीएमने एकूण ८५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांच्या पुनर्खरेदीला (बायबॅक) मान्यता दिली आहे. या माध्यमातून खुल्या बाजारातून ८१० रुपये प्रति समभाग या किमतीला विद्यमान गुंतवणूकदारांकडून समभागाची खरेदी करण्यात येणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम समभागांच्या कामगिरीवर दिसून आला. गेल्या वर्षातील २६ डिसेंबरपासून मागील १४ पैकी १२ सत्रांमध्ये समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होता. या कालावधीत समभाग १५ टक्क्यांनी वधारला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 20:29 IST

संबंधित बातम्या