पीटीआय, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या आक्रमक कपातीनंतर, येत्या २७ जूनला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या कामगिरीच्या आढाव्याबरोबरच बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठय़ाची अर्थमंत्री माहिती घेणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात ६ जूनला रेपो दरात अर्धा टक्क्यांची कपात केली. याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि बँकांना पतपुरवठ्यासाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा म्हणून रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआरमध्ये अनपेक्षितरित्या मोठी कपात केली गेली. त्यानंतर अर्थमंत्र्यांकडून ही पहिलीच आढावा बैठक होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीचा आणि चालू आर्थिक वर्षातील त्यांच्या उद्दिष्टांचा आढावा घेतील. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विकास दर ६.५ टक्के असा चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर रोडावल्याने, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बँकांनी उत्पादक क्षेत्रांना अधिक कर्ज देण्याचे आवाहन अर्थमंत्र्यांकडून केले जाऊ शकेल.
किसान क्रेडिट कार्ड, पीएम मुद्रा आणि जन सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) या सारख्या तीन सामाजिक सुरक्षा योजना आणि अटल पेन्शन योजना यासह विविध विभागांचा आणि सरकारी योजनांमधील प्रगतीचा व्यापक आढावा बैठकीत घेतला जाऊ शकतो.
सरकारी बँकांना १.७८ लाख कोटींचा विक्रमी नफा
मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा (पीएसबी) एकत्रित नफा १.७८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत २६ टक्क्यांनी वधारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व १२ बँकांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण १.४१ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला होता. यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षात त्यात थेट ३७,१०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
एकट्या स्टेट बँकेचे एकूण नफ्यात ४० टक्क्यांहून अधिक योगदान असून, तिचा निव्वळ नफा ७०,९०१ कोटी रुपयांचा आहे. मागील आर्थिक वर्षातील ६१,०७७ कोटी रुपयांच्या तुलनेत तो १६ टक्के वाढला आहे. टक्केवारीच्या बाबतीत, पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात १०२ टक्क्यांची वाढ झाली असून तिने १६,६३० कोटी रुपये नफा नोंदवला. पंजाब अँड सिंध बँकेच्या नफ्यात ७१ टक्क्यांनी वाढ होऊन तो १,०१६ कोटी रुपये झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व १२ बँकांनी २०२४-२५ मध्ये नफ्यात वाढ नोंदवली आहे.