नवी दिल्ली : केंद्र सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्च यातील दरी असणारी देशाची वित्तीय तूट एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ९.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ५८.९ टक्के आहे.

वर्षभरापूर्वी याच कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्षांच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये वित्तीय तुटीचे प्रमाण तत्कालीन अंदाजाच्या तुलनेत ४६.२ टक्के राहिले होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या पहिल्या आठ महिन्यांत सरकारला मिळालेले महसुली उत्पन्न वार्षिक तुलनेत १४.६४ लाख कोटी रुपये असे अर्थसंकल्पातील अंदाजाच्या प्रमाणात ६४.१ टक्के राहिले आहे. तर गेल्या वर्षी या काळात संकलित महसुलाने अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६९.८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. तर नोव्हेंबपर्यंत आठ महिन्यांत सरकारचा खर्च २४.४२ लाख कोटी रुपये झाला आहे. जो संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी अंदाजाच्या तुलनेत ६१.९ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच काळातील खर्च यापेक्षा कमी म्हणजे एकूण अंदाजाच्या ५९.६ टक्के इतका राहिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निव्वळ कराच्या माध्यमातून केंद्र सरकारला १२.२५ लाख कोटी रुपयांचा महसूल नोव्हेंबरअखेपर्यंत मिळाला आहे. जे अर्थसंकल्पात नमूद केलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ६३.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी या काळात कर महसुलाने ७३.५ टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. तर एप्रिल ते नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारचा भांडवली खर्च ४.४७ लाख कोटी रुपये झाला आहे. जो संपूर्ण वर्षांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५९.६ टक्के इतका आहे.