नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या किमती वाढल्या असूनही देशभरात सोने खरेदी उत्साहात पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने विक्री मूल्याच्या दृष्टीने ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दिवसाच्या पहिल्या सत्रात ग्राहकांची गर्दी केली होती. मात्र महाराष्ट्रासह देशभरात उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारनंतर गर्दी ओसरली होती. देशाच्या विविध भागांमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ९९,५०० ते ९९,९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कमकुवत कल पाहता बुधवारी नवी दिल्लीत सोन्याच्या किमतीत ९०० रुपयांनी घसरण होऊन तो ९८,५५० रुपये प्रति १० ग्रॅम असा होता.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,३०० रुपये होती. ज्यात ३७.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये ३७.६ टक्क्यांची म्हणजेच तीस हजारांहून अधिक रुपयांची वाढ झाली. लग्नसराईचा हंगाम नजीक असल्याने सोने खरेदीकडे अनेकांचा कल राहिला. यामध्ये ग्राहकांची मागणी लक्षात घेता पेशवाई, पारंपरिक, दाक्षिणात्य यासह विविध शैलीतील दागिन्यांसह कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती मिळाली.

सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या २० टनांच्या पातळीवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. यंदा २५-४० वर्षे वयोगटातील ग्राहक सोने आणि चांदी खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत होते. गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडेदेखील कल वाढत असल्याने नाणी आणि बार खरेदी करत आहेत, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकेडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोन्याच्या किमती सध्या विक्रमी उच्चांकी पातळीजवळ असूनही, सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कायम आहे. ग्राहकांना अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर किंवा लग्न-समारंभाच्या प्रसंगाला खर्च व्यवस्थापन करून सोने खरेदी करतात. सोने खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८-९ टक्क्यांची घसरण होणार असली तरी मूल्याच्या आधारे २०-२५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. – सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स