मुंबई : सोने तारण कर्जाच्या क्षेत्रात बँकांनी आघाडी घेतली असून, बँकेतर वित्तीय संस्थांच्या (एनबीएफसी) तुलनेत त्या वेगाने विस्तार पावत आहेत. परिणामी मार्च २०२६ पर्यंत ही संघटित कर्ज बाजारपेठ १५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने शुक्रवारी व्यक्त केली.

मार्च २०२७ पर्यंत बाजाराकडून हा टप्पा गाठण्याची ‘इक्रा’ला आशा आहे. सोने तारण कर्ज बाजाराचे आकारमान आर्थिक वर्ष २०२७ अखेरपर्यंत १८ लाख कोटी रुपयांपर्यंत वेगाने विस्तारत राहील. मुख्यतः सोन्याच्या किमतींमधील स्थिर वाढीमुळे याला चालनाच नव्हे तर अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढ सुरू आहे. लक्षणीय म्हणजे या क्षेत्रात वरचष्मा असलेल्या बँकेतर वित्तीय संस्थांना मागे सारणारी बँकांनी कामगिरी आहे. मार्च २०२५ पर्यंत सुवर्ण कर्ज पोर्टफोलिओत बँकांचा बाजार हिस्सा ८२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

बँकांची सोने तारण कर्ज व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आर्थिक वर्ष २०२० आणि आर्थिक वर्ष २०२५ दरम्यान सुमारे २६ टक्क्यांच्या वार्षिक चक्रवाढ दराने वाढली आहे. याच कालावधीत बँकेतर संस्थानी नोंदवलेल्या २० टक्के वाढीपेक्षा ती लक्षणीयरीत्या अधिक आहे. मार्च २०२५ पर्यंत एकूण सोने कर्ज मालमत्ता ११.८ लाख रुपये होता, असे ‘इक्रा’ने अहवालात नमूद केले आहे.

बँकांनी त्यांच्या पोर्टफोलिओ रचनेतही धोरणात्मक बदल पाहिले आहेत. मार्च २०२५ मध्ये किरकोळ/वैयक्तिक सुवर्ण कर्जांचा वाटा गेल्या वर्षीच्या ११ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर सोन्याच्या दागिन्यांद्वारे सुरक्षित केलेल्या कृषी आणि इतर कर्जांचा वाटा मागील पातळीपेक्षा ७० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ६३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि असुरक्षित कर्ज उत्पादनांमध्ये कमी वाढ लक्षात घेता, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एनबीएफसीच्या सोने कर्जाच्या मालमत्तेमध्ये ३०-३५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा ‘इक्रा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सह-समूह प्रमुख एएम कार्तिक यांनी व्यक्त केली.

जून २०२५ पर्यंत एनबीएफसींची सोने कर्ज मालमत्ता अंदाजे २.४ लाख कोटी रुपये होती, ज्यात वार्षिक आधारावर ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे इक्राने म्हटले आहे. चार आघाडीच्या एनबीएफसींनी सोने तारण कर्जात ८१ टक्के हिस्सा राखला आहे, असे अहवालात नमूद आहे.