मुंबईः दर दिवसाला नवनवीन उच्चांक गाठत असलेल्या सोन्याच्या किमती पाहता, लोकांकडून जुन्या वापरात असलेले दागिने, वळी यांची मोड देखील वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्यातील मोडीचे प्रमाण दुप्पट झाले असून, चांदी विकू पाहणारा ग्राहक सराफ बाजारासाठी मौल्यवान बनला आहे.
ग्राहकांकडून जुने सोने विकून त्यातून पैसे मोकळे करून घेणे प्रत्यक्षात वाढले नसले तरी जुने दागिने मोडून त्यातून नवी दागिने घडविण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, असे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले. वाढलेल्या आयात किमती पाहता, मोड म्हणून आलेल्या सोन्याचा पुरवठा गत वर्षातील साधारण २५ टक्क्यांवरून, सध्याच्या घडीला ५० टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी नमूद केले.
आयात शुल्कात कपात केल्यामुळे २०२४ मध्ये भारतातील सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत ५ टक्क्यांनी वाढून ८०२.८ टन झाली, असे जागतिक सुवर्ण परिषदेची (डब्ल्यूजीसी) आकडेवारी सांगते. तर गेल्या वर्षी भारतातील जुन्या व वापरात असलेल्या सोन्याचा पुरवठा एकूण ११४.३ टन होता. या पुरवठ्यात २०२५ मध्ये वाढ होईल, असा डब्ल्यूजीसीचाही अंदाज आहे.
दुसरीकडे, पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असलेल्या चांदीचा पुरवठा हा मुंबईतील त्याचा घाऊक बाजार असलेल्या जव्हेरी बाजाराने दोन दिवसांपासून अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. किरकोळ जवाहिरांना चांदी मिळणे दुरापास्त झाले असून, प्रति किलो ग्रॅम ३० हजार रुपये इतके अधिमूल्य देऊन, सराफ तसेच वैयक्तिक ग्राहक चांदी मिळवत आहेत, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी माहिती दिली. ‘एमसीएक्स’वर चांदीच्या किमतींनीही गुरुवारी (१६ ऑक्टोबर) नवीन उच्चांक गाठला. चांदीचा भाव २,४५४ रुपयांनी वाढून १,६४,६६० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
मोड वाढणे याचा अर्थ मौल्यवान धातूची मागणी आणि आकर्षणही कायम आहे आणि हा बदल स्वागतार्ह असल्याचे डॉ. गाडगीळ म्हणाले. एक तर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार देश आहे, तर त्याचवेळी फोर्ट नॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी सोन्याची आगार असलेल्या अमेरिकेतील ठिकाणानंतर, सर्वाधिक जवळपास २५ हजार टन इतका सुवर्ण संचय हा भारतीय घराघरात आहे. तो मोकळा होत असेल तर आयात खर्चात आणि पर्यायाने परकीय चलनात ती लक्षणीय बचत ठरेल. शिवाय जुन्या दागिन्यांच्या बदल्यात, नवप्रवाहाला साजेशा रचनेत, विशेषतः हलके दागिने घडविण्याला ग्राहकांचे प्राधान्य आहे, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान सोन्याच्या किमती सुमारे ५७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) देशांतर्गत वायदा व्यवहारात सोन्याच्या किमती १,१८५ रुपयांनी वाढून १,२८,३९५ रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि सततच्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या भाव प्रति औंस ४,२५० डॉलरवर गेले आहेत. गोल्डमन सॅक्सच्या मते, जागतिक भाव ५,००० डॉलर झाल्याचे दिसल्यास ते नवलाचे ठरणार नाही. एकंदर जागतिक अनिश्चिततेत भर घालणाऱ्या कारणांमुळे सोन्याच्या भावात दीर्घकालिक वाढ सुरू राहिल, असे एमपी फायनान्शियल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस एलएलपीचे व्यवस्थापकीय भागीदार महेंद्र पाटील यांनी सूचित केले.