वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’मधील पुढील हिस्सा विक्रीसंदर्भात काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात ३ टक्के हिस्सेदारी विकली जाण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा फॉलोअप पब्लिक ऑफर अर्थात एफपीओच्या माध्यमातून किंवा आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून एलआयसीचे समभाग खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
बऱ्याचदा एफपीओच्या माध्यमातून शेअर विक्री करताना कंपनीकडून ते सवलतीच्या दरात अर्थात बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी देण्यात येते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीमधील सरकारच्या हिस्सेदारीचा काही भाग विकण्याची तयारी करण्यासाठी केंद्र सरकार पुढील दोन आठवड्यात रोड शो सुरू करण्याची अपेक्षा आहे.
विक्रीच्या पहिल्या टप्प्यात एलआयसीचे २.५ टक्के ते ३ टक्के शेअरची विक्री केली जाऊ शकते. विक्रीसाठी ऑफर (ओएफएस) साठी गुंतवणूक बँका मोतीलाल ओसवाल आणि आयडीबीआय कॅपिटल यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे शेअर विक्रीचे आकारमान आणि किंमत रोड शोनंतर ठरवली जाण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात केंद्राला शेअर विक्रीतून १४,००० कोटी ते १७,००० कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. सध्या, एलआयसीमध्ये सरकारचा ९६.५ टक्के हिस्सा आहे. भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एलआयसीला १६ मे २०२७ पर्यंत सार्वजनिक हिस्सा सध्याच्या ३.५ टक्क्यांवरून कमीत कमी १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मुदत दिली आहे.
सरकारची सध्या एलआयसीमध्ये ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. याआधी मे २०२२ मध्ये प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ३.५ टक्के हिस्सा विक्री करून २१,००० कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. त्यावेळी ‘एलआयसी’ने भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ९०२-९४९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला होता. बाजारपेठेतील सद्यस्थिती पाहून निर्गुंतवणूक विभाग हिस्सा विक्रीचा निर्णय घेणार आहे. येत्या १६ मे २०२७ पर्यंत केंद्र सरकारला एलआयसीमधील ६.५ टक्के हिस्सा विक्री करावी लागणार आहे. केंद्र सरकारने विद्यमान आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ४७,००० कोटी रुपयांचे निधी उभारणीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार ‘एलआयसी’चे ५. ६१ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. बुधवारच्या सत्रात ‘एलआयसी’चा समभाग ३.१६ टक्क्यांच्या घसरणीसह ८८७.५० रुपयांवर बंद झाला. समभागाने वर्षभरात ७१५.३० रुपयांची नीचांकी आणि १०९५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.
पदार्पणावेळी गुंतवणूकदारांची निराशा
एलआयसीच्या समभागाने भांडवली बाजारातील पदार्पणाला पॉलिसीधारकांसह गुंतवणूकदारांची निराशा केली होती. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना हा समभाग सूचिबद्धतेला ८ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले. वर्ष २०२२ मध्ये एलआयसीच्या भागविक्रीसाठी जवळपास २.९५ पट अधिक भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला आणि गुंतवणूकदारांकडून ४३,९३३ कोटी रुपये गोळा झाले होते. मात्र प्रारंभिक भागविक्रीनंतर प्रति समभाग ९४९ रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र जशी अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे भावातील मोठय़ा मुसंडीसह सूचिबद्धता होण्याऐवजी समभागाने ८ टक्के घसरणीसह सुरुवात करीत गुंतवणूकदारांची निराशा केली.