वृत्तसंस्था, नवी दिल्ली : संकटग्रस्त अदानी समूहाने आपल्या काही कंपन्यांच्या स्वतंत्र लेखापरीक्षणासाठी ग्रँट थॉर्नटनची नियुक्ती केली असल्याचे वृत्त निराधार असून ती केवळ ‘बाजारातील अफवा’ असल्याचे अदानी समूहातील कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी स्पष्ट केले.
अमेरिकी गुंतवणूक संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालातील आरोप तसेच समभागांच्या पडझडीने हवालदिल गुंतवणूकदार आणि नियामकांना आश्वस्त करण्यासाठी समूहातील कंपन्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून यासाठी ग्रँट थॉर्नटनची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ग्रँट थॉर्नटनकडून समूहातील कंपन्यांकडून निधीचा गैरवापर करण्यात आला आहे काय आणि कर्जे ज्या उद्देशासाठी घेतली होती त्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरली गेली आहेत का? शिवाय कंपन्यांचे ताळेबंद आणि खत्यावण्या स्वच्छ आणि दोषरहित आहे का याची तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
मात्र अदानी एंटरप्रायझेसने ही बाजारातील अफवा असल्याचे सांगत त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही, असे आघाडीचे बाजारमंच असलेल्या मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला कळविले. ग्रँट थॉर्नटन हे एक स्वतंत्र कर आणि सल्लागार संस्थांचे जागतिक प्रतिष्ठा असलेले जाळे आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारीला अदानी समूहाने प्रत्येक कंपनीचा ताळेबंद ‘अत्यंत निरोगी’ असून कंपन्यांच्या वाढीच्या योजना अबाधित आहेत. तसेच समूहाने व्यवसायाच्या विस्तार योजनांसाठी पुरेशा निधीची तरतूद केली असल्याचे स्पष्ट करत गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय खडाजंगीचे केंद्र बनलेल्या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ आणि तिच्या अदानी समूहावरील अहवालातील आरोपांचीच दखल घेत त्यासंबंधाने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’नेदेखील तपास सुरू केला आहे.