पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधन केलं. २२ सप्टेंबरपासून देशात बचत उत्सव सुरु होतो आहे हे म्हणत त्यांनी देशाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. जीएसटी आता फक्त दोनच प्रकारचा असणार आहे तो म्हणजे ५ टक्के आणि १८ टक्के. इतर जीएसटी असलेल्या वस्तूंचा कर कमी करुन ५ टक्के किंवा अगदी शून्य करण्यात आला आहे. आता या कपातीत सोनं खरेदी करावं की नाही? याबाबत तज्ज्ञांनी मतं मांडली आहेत.
२२ सप्टेंबरपासून जीएसटी २.०
२२ सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी २.० लागू असेल. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. शाम्पू, साबण, कार, बाईक यासह अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. दरम्यान ही वेळ सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का? सोन्याच्या दरांमध्येही कपात होणार का? हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.
मागच्या सात दिवसांमध्ये सोन्याचे दर कसे?
१५ सप्टेंबर- सोन्याचा दर १ लाख १० हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम
१६ सप्टेंबर- सोन्याचा दर १ लाख १० हजार ६२० रुपये प्रति १० ग्रॅम
१७ सप्टेंबर- सोन्याचा दर १ लाख १० हजार ३६० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ सप्टेंबर- सोन्याचा दर १ लाख १० हजार ३६० रुपये प्रति १० ग्रॅम
१९ सप्टेंबर-सोन्याचा दर १ लाख ११ हजार १०० रुपये प्रति १० ग्रॅम
२० सप्टेंबर-सोन्याचा दर १ लाख १२ हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम
२१ सप्टेंबर-सोन्याचा दर १ लाख ९ हजार ७७५ रुपये प्रति १० ग्रॅम
GST कपातीचा परिणाम सोन्याच्या दरांवर होणार का?
जीएसटी कपातीचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर होणार नाही. व्यापार विषयक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील. अशा स्थितीत गुंतवणूक कुठे करायची? हा विचार जर लोकांनी केला तर त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा एक उत्तम पर्याय असेल. जर लोक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे वळले तर उलट सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात असं तज्ज्ञांना वाटतं.
सोनं खरेदीची ही योग्य वेळ?
सोनं खरेदी करायचं असेल तर ही योग्य वेळ आहे का? हे विचारलं असता तज्ज्ञ म्हणतात दीर्घ काळाची गुंतवणूक म्हणून विचार करत असाल तर सोनं खरेदी करता येईल. खरंतर जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे त्यामुळे अनेक देशांमधल्या रिझर्व्ह बँका सोन्याची खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्या ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी थोडी वाट पाहिली पाहिजे असंही मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.