नवी दिल्लीः अमेरिकेने एच-१बी व्हिसा शुल्कात मोठी वाढ केल्याने भारतातून होणारे ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजेच प्रतिभावंतांचे स्थलांतरण कमी होण्यास मदत होणार असून, भारताने या गुणवत्तेचा योग्य वापर करून घेण्यासाठी संधी निर्माण करायला हव्यात, असे तज्ज्ञांनी सोमवारी मत व्यक्त केले.

अमेरिकेने एच-१ बी व्हिसावरील शुल्क एक हजार डॉलरवरून, १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपयांवर नेले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेत नोकरीपेशासाठी जाणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकिंगतज्ज्ञ अजय बग्गा म्हणाले की, अमेरिकेने एच-१बी व्हिसा शुल्कात केलेली वाढ ही भारतातील बुद्धीवंतांचे स्थलांतर कमी करण्यास मदत करेल. माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्याकडून एच-१बी व्हिसाद्वारे दरवर्षी ५ ते १० हजार कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते. आता या कंपन्यांकडून हे काम बाह्य स्त्रोतांकडे सोपविले जाईल. त्यामुळे व्यवसायाच्या पद्धतीतही मोठा बदल होईल.

व्हिसा शुल्कातील वाढीचा परिणाम केवळ आयटी क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. आरोग्य सुविधा, वैद्यक व्यावसायिक, परिचारिका आणि इतर वित्तीय सेवा कंपन्यांवरही याचा परिणाम होईल. अमेरिकेतील अनेक क्षेत्रे ही मोठ्या प्रमाणात परदेशी कुशल कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत. जसे अमेरिकेच्या ग्रामीण भागात सुमारे १६ हजार भारतीय वंशाचे डॉक्टर कार्यरत आहेत. एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेतील अनेक भागांना मोठा फायदा होत आहे, असेही बग्गा यांनी नमूद केले.

१४ अब्ज डॉलरचा अतिरिक्त बोजा

व्हिसा शुल्कातील ही वाढ कायम राहिल्यास पुढील वर्षी आणि आधीएवढेच व्हिसा मंजूर झाल्यास कंपन्यांवर या कारणापोटी १४ अब्ज डॉलरचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यातून या कंपन्यांच्या नफ्यात मोठी घसरण होईल. यामुळे व्हँकुव्हर (कॅनडा) अथवा इतर अमेरिकेबाहेरील केंद्रांकडे व्यवसायांचा कल राहिल. तिथे व्यवसाय सुरू करून ते खर्चात बचतीचे पाऊल उचलतील, असेही बग्गा यांनी नमूद केले.