मुंबई : करोना साथीच्या काळात जनमानसांत दिसून आलेली विमाविषयक आस्थेत त्यानंतर दिसून आलेली घसरण पाहता, देशातील आय़ुर्विमा क्षेत्रातील कंपन्यांनी एकत्रितपणे पावले टाकण्याचा निर्णय घेताना, आगामी तीन वर्षांच्या जनजागरणाच्या मोहिमेवर ४५० कोटी रुपये खर्चाच्या नियोजनाची बुधवारी घोषणा केली.
म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘ॲम्फी’ने राबविलेल्या ‘म्युच्युअल फंड सही है’ मोहिमेच्या धर्तीवर, आयुर्विमा क्षेत्राची प्रातिनिधिक संघटना ‘लाइफ इन्शुरन्स कौन्सिल’च्या विमा जागरूकता समितीने ‘सबसे पहले जीवन विमा’ या घोषवाक्यासह ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी सर्व आयुर्विमा कंपन्यांचे त्यांच्या प्रीमियम उत्पन्नाच्या आधारावर योगदान असेल. सामान्य विमा क्षेत्रातील कंपन्यांनीही अलिकडेच ‘अच्छा किया, इन्शुरन्स लिया’ असा संदेश देणारी प्रसार मोहिम सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विम्याच्या प्रसाराला उतरती कळा लागली आहे. कंपन्यांनी गोळा केलेला एकूण प्रीमियमची रक्कम ही आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत ३.२ टक्के आहे. देशातील विम्याच्या सखोलतेचे (पेनिट्रेशन) हे मापन आधीच्या वर्षात ३.७ टक्के तर करोनाच्या दुसऱ्या लाटेपश्चात म्हणजे २०२२-२३ मध्ये ४ टक्के पातळीवर होते.
या स्थितीत बदल करण्याच्या भावनेने सुरू झालेल्या प्रयत्नांबाबत पत्रकारांशी बोलताना आयुर्विमा परिषदेचे अध्यक्ष कमलेश राव म्हणाले, आम्ही दरवर्षी किमान १५०-१६० कोटी रुपये विविध माध्यमांमध्ये जाहिराती व जनजागराच्या कार्यक्रमावर खर्च करू पाहात आहोत. ही मोहीम किमान तीन वर्षे चालवण्यासाठी सर्व कंपन्यांनी वचनबद्धता दर्शविली आहे.
भारत अजूनही जगातील १० वी सर्वात मोठी विम्याची बाजारपेठ आहे. परंतु देशाच्या १४० कोटी लोकांपैकी फक्त ३६ कोटी लोकांकडेच सध्या विमा संरक्षण आहे. त्यामुळे आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे या क्षेत्राची नियामक ‘इर्डा’चे सदस्य स्वामीनाथन अय्यर म्हणाले.