दक्षिण कोरियाच्या कंपन्या ह्युंदाई आणि एलजी पाठोपाठ आता, जागतिक शीतपेय क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी कोका-कोला देखील तिची भारतातील बॉटलिंग व्यवसायातील उपकंपनीसाठी प्रारंभिक समभाग विक्रीची योजना आखत आहे. हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडकडून (एचसीसीबी) ही कंपनी यानिमित्ताने गुंतवणूकदारांना आजमावण्याची शक्यता आहे.
संभाव्य आयपीओचे मूल्य १ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८,८०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असू शकते. आयपीओबाबतची चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून कंपनीने अद्याप यासाठी मर्चंट बँकांची नियुक्ती केलेली नाही, असे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात म्हटले आहे. या प्रस्तावित विक्रीसाठी अद्याप कालावधी आणि आकारमान निश्चित झाले नसले तरी, पुढील आर्थिक वर्षात हा आयपीओ येण्याची शक्यता आहे. मात्र या आयपीओमुळे जगात सर्वदूर परिचित असलेली कंपनीचे समभाग भारताच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध होतील.
नुकतेच भारतीय भांडवली बाजारात ह्युंदाई मोटर इंडिया आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियासारख्या मोठ्या कंपन्यांनी पदार्पण केले. त्यानंतर भारतातील बहुराष्ट्रीय कंपनीकडून आणला जाणारा हा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. अत्यंत स्पर्धात्मक वातावरण असले तरी कोका-कोलासाठी भारत ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. या कंपनीला पेप्सिकोसह, मुकेश अंबानींकडून पुनरूज्जीवित करण्यात आलेल्या कॅम्पा कोलासारख्या नाममुद्रेकडून स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
एचसीसीबीचे देशातील १२ राज्यात १४ उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत आणि २० लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांना ती कोका-कोलाच्या शीतपेयांचा पुरवठा करते. अलिकडच्या काळात हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडमधील अल्प हिस्सा जुबिलंट या भारतीय समूहाला विकण्यात आला आहे, जे स्थानिक भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.