पीटीआय, नवी दिल्ली : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार हा सध्याच्या अनिश्चितत जागतिक अर्थचित्रातील एक परिवर्तनकारी क्षण आहे, ज्याने मूल्याधारीत भागीदारीचा आराखडा तयार केला, अशा शब्दांत भारतीय उद्योगजगताने गुरुवारी या ऐतिहासिक कराराचे स्वागत केले.

ब्रिटिश कंपन्यांना व्हिस्की, मोटारी आणि इतर उत्पादने भारतात निर्यात करणे सोपे करून, ब्रिटनला होणाऱ्या ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील शुल्क कमी करणाऱ्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर प्रमुख उद्योगपतींनी स्वागतपर प्रतिक्रिया दिल्या. हा दोन्ही देशांसाठी विजय असेल, ज्यायोगे आर्थिक भागीदारीला चालना आणि उद्योजकतेला प्रोत्साहनासह अधिक नोकऱ्या आणि संधी निर्माण करेल, असे महिंद्र समूहाचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह म्हणाले. ते पुढे म्हणाले, जागतिक व्यवस्थेत एक विश्वासार्ह भागीदार आणि नवोन्मेषाचे शक्तिकेंद्र म्हणून भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचा हा करार एक पुरावा आहे.

समृद्धी, शाश्वतता आणि विश्वासावर आधारित सामाईक भविष्य घडवण्यासाठी धाडसी नेतृत्वाबद्दल दोन्ही सरकारांचे प्रमुख कौतुकास पात्र ठरतात, असे भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले. ‘भारत-ब्रिटन सीईओ फोरम’चे सह-अध्यक्ष असलेले मित्तल म्हणाले, हा करार एक आधुनिक, भविष्यवादी भागीदारी स्थापित करतो जो बाजारपेठेत प्रवेश सुलभता आणि गुंतवणुकीला चालना देईल. दोन्हींकडील व्यवसायांना याचा प्रचंड फायदा होईल.

वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले, गेल्या दोन दशकांत भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, नव्या करारामुळे त्याला आणखी गती मिळेल. ब्रेक्झिटनंतर आणि युरोपियन अर्थव्यवस्थेसोबत भारताचा हा पहिला करार आहे.

हा व्यापार करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या वाढत्या जागतिक सहभागाचे प्रमाण आहे आणि जागतिक मूल्य साखळीत आपले स्थान त्यातून मजबूत केले जाईल, असा विश्वास श्री सिमेंट लिमिटेडचे उपाध्यक्ष प्रशांत बांगर यांनी व्यक्त केला. टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले की, भारत-ब्रिटन करार हा एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्याने भारतीय कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’ नाममुद्रा जगासमोर घेऊन जाण्यासाठी नवीन दालन खुले केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले, द्विपक्षीय संबंधांमध्ये हा एक निर्णायक क्षण आहे, जो समावेशक वाढ, आर्थिक कणखरता आणि औद्योगिक परिवर्तनासाठी सामाईक वचनबद्धता दर्शवितो. ‘फिक्की’चे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल यांच्या मते, भारताच्या विकसित होत असलेल्या व्यापार व्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो सखोल जागतिक आर्थिक एकात्मतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.