पुणे : देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत मोठी मागणी दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ६२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहे. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात तब्बल ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात कार्यालयीन जागांच्या व्यवहारात बंगळूरु आघाडीवर आहे.

देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. त्यात देशांतील आठ महानगरांतील कार्यालयीन जागांच्या व्यवहारांचा जानेवारी ते मार्च तिमाहीतील आढावा घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, बंगळूरुमध्ये सर्वाधिक ३५ लाख चौरस फुटांचे कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. देशातील एकूण व्यवहारांत हे प्रमाण २२ टक्के आहे. त्याखालोखाल दिल्लीचा क्रमांक असून, ३१ लाख चौरस फुटांचे कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले. हैदराबादमध्ये कार्यालयीन जागांच्या व्यवहारांत करोना संकटापूर्वीची पातळी गाठली असून, ३० लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांच्या व्यवहारात सर्वाधिक वाढ हैदराबादमध्ये २६१ टक्के नोंदविण्यात आली असून त्याखालोखाल पुण्यात १४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

हेही वाचा : गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी

यंदा पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांमध्ये सर्वाधिक व्यवहार बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील कार्यालये, जागतिक सुविधा केंद्रे यांचा वाटा सर्वाधिक आहे. हा वाटा अनुक्रमे ५९ लाख चौरस फूट आणि ५० लाख चौरस फूट आहे. फ्लेक्स स्पेसचा वाटा ३८ लाख चौरस फूट आहे. रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण कमी होऊन १५.८ टक्क्यांवर आले आहे. नवीन जागांचा पुरवठा कमी झाल्याने रिकाम्या जागांचे प्रमाण घटले आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा : एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य

कार्यालयीन जागांचे व्यवहार (लाख चौरस फुटांमध्ये)

महानगर – जागा

बंगळूरु – ३५

दिल्ली – ३१
हैदराबाद – ३०

मुंबई – २८
पुणे – १९

चेन्नई – १२
अहमदाबाद – ५

कोलकता – २

एकूण – १६२