मुंबई : मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल सोमवारच्या सत्रात प्रथमच ४००.८६ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. सोमवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात सुमारे १.५५ लाख कोटींची भर पडली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल गेल्या वर्षी जुलैमध्ये ३०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. म्हणजे अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत बाजारभांडवलात १०० लाख कोटींची भर पडली. जागतिक बाजारपेठेतील आशावाद आणि परदेशी निधी प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे निर्देशांकांना अधिक बळ मिळाले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ४९४.२८ अंशांची कमाई करत तो ७४,७४२.५० या नव्या शिखरावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ६२१.०८ अंश तेजी दर्शवत ७४,८६९.३० ही विक्रमी पातळी गाठत ७५ हजारांच्या दिशेने कूच केली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२.६० अंशांची वाढ झाली आणि तो २२,६६६.३० या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसभरात, त्याने २२,६९७.३० विक्रमी पातळीला स्पर्श केला.

हेही वाचा : सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

चौथ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी सकारात्मक राहण्याची आशेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम आहे. वाहन निर्मिती, तेल आणि वायू, गृहनिर्माण या क्षेत्रात तेजी कायम आहे. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवरील खर्च कमी केल्याने त्यांची कामगिरी चौथ्या तिमाहीत काहीशी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, युरोपीय मध्यवर्ती बँकेचे व्याजदर धोरण आणि इंग्लंडमधील जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार आहे. परिणामी जगभरातील गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष लागले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये मारुती, महिंद्र अँड महिंद्र, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक आणि पॉवर ग्रिड यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर नेस्ले, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, टायटन, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिसच्या समभागात मात्र घसरण झाली.

तेजीची कारणे कोणती?

निवडणूकपूर्व तेजी

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत राहण्याची अपेक्षा केली जात आहे. यामुळे सद्यस्थितीतील योजना विस्तार कायम राहण्याच्या आशेने गुंतवणूकदार सकारात्मक आहेत.\

हेही वाचा : एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य

क्षेत्रीय खरेदीवर जोर

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, १५ पैकी १० क्षेत्रांमध्ये सकारात्मक व्यवहार पार पडले. निफ्टी ऑटो, निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी रिअल्टी या उप-निर्देशांकांनी अनुक्रमे १.८१ टक्के, १.०७ टक्के आणि १.७० टक्क्यांनी वाढ दर्शवली

परदेशी खरेदीदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील सत्रात निव्वळ १६६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३,३७० कोटी रुपये किमतीचे समभाग विकले.