मुंबई: सोने तारण कर्ज क्षेत्रातील ठेवी न स्वीकारणारी बँकेतर वित्तीय कंपनी ‘इंडेल मनी लिमिटेड’ची प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित विमोचनयोग्य, अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सहाव्या टप्प्यातील सार्वजनिक विक्री येत्या १३ ऑक्टोबरपासून खुली होईल. २८ ऑक्टोबरपर्यंत ही रोखे विक्री सुरू राहणार असली तरी, भरणा पूर्ण झाल्यास मध्यावधीत अथवा ती लवकर बंद केली जाऊ शकेल.
सुरक्षित रोख्यांच्या विक्रीतून एकूण ३०० कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे. उभारण्यात आलेला निधी पुढील कर्ज, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या कर्जावरील मुद्दल आणि व्याजाची परतफेड/ मुदतपूर्व परतफेड या उद्देशांसाठी वापरला जाईल.
पूर्णपणे सुरक्षित या रोख्यांना इन्फोमेरिक्स रेटिंग्जने ‘आयव्हीआर ए-/स्थिर’ असे मानांकन बहाल केले आहे. ३६६ दिवस ते ७२ महिन्यांपर्यंतचा मुदत कालावधीच्या विविध गुंतवणूक पर्याय तिने प्रदान केले असून, सर्व मालिकांमध्ये किमान अर्ज रक्कम ही १०,००० रुपये आहे. यातील ७२ महिन्यांत गुंतवणुकीला दुप्पट करणारी ‘मालिका-८’ समाविष्ट असून, वार्षिक १२.२५ टक्क्यांपर्यंत प्रभावी लाभ यातून गुंतवणूकदारांना मिळविता येईल.
गुंतवणूकदारांनी या पूर्वीच्या रोखेविक्रीला चांगला प्रतिसाद दिला असून, बाजारातून निधी उभारण्याबाबत आपण खूप आशावादी आहोत, असे इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश मोहनन म्हणाले. गुंतवणूकदारांचा इंडेल मनीचे व्यवसाय प्रारूप, वाढीच्या शक्यता, नफा आणि प्रशासन संस्कृतीवर दृढ विश्वास आहे. एकूण कर्ज वितरणांत ९० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या सोने तारण कर्ज या मुख्य ताकदीचा फायदा घेऊन, कंपनी देशभरात उपस्थिती विस्तारत आहे. शाखांच्या विस्तृत जाळ्याद्वारे सोने तारण कर्ज विभागातील आघाडीचे स्थान मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे मोहनन म्हणाले.
कर्ज पोर्टफोलिओ वाढविण्याबरोबरच, नफा वाढवण्यावर आमचे लक्ष अबाधित राहील. ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये आम्हाला प्रचंड संधी दिसतात. तेथे आम्ही विश्वासार्ह, पारदर्शक आणि त्रासमुक्त आर्थिक उपायांसह व्यक्ती आणि लहान व्यवसायांना सेवा देण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
विक्रीपश्चात या एनसीडी – रोख्यांची मुंबई शेअर बाजारात सूचीबद्धता केली जाणार असून, डीमॅट स्वरूपात त्यांची खरेदी-विक्री शक्य होईल. ३० जून २०२५ रोजी इंडेल मनीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) २,६९० कोटी रुपये आहे. कर्ज पोर्टफोलिओच्या ९१.८२ टक्क्यांपर्यंत हिस्सा हा सोने तारण कर्जाचा आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, इंडेल मनीकडे हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार, गुजरात, राजस्थान आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ३६६ शाखांचे जाळे आहे.