नवी दिल्ली : दुर्मिळ खनिज संसाधनांना बळकटी देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात संपूर्ण देशभरात मूल्य साखळी तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करत, आयआरईएल इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक आणि रेअर अर्थ डिव्हिजनचे प्रमुख व्ही. चंद्रशेखर यांनी देशातील अनेक राज्यात दुर्मिळ खनिजांचे साठे आहेत, असा शुक्रवारी दावा केला.

या विषयावरील भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’द्वारे आयोजित परिषदेसाठी आले असता, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चंद्रशेखर म्हणाले की, तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसह अनेक भारतीय राज्यांमध्ये दुर्मिळ खनिजाचे (रेअर अर्थ) मुबलक साठे आहेत आणि त्यांची कंपनी त्याची उपलब्धता सुधारण्यासाठी गांभीर्याने काम करत आहे. आयआरईएल इंडिया लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी असून ती अणुऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ही कंपनी अणुऊर्जा क्षेत्र आणि इतर उद्योगांसाठी धोरणात्मक साहित्य आणि खनिज संसाधने पुरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

चीनकडून अनेक निर्बंध आल्यामुळे दुर्मिळ खनिज चुंबकांची आयात करणे ही आता मोठे अडचणीचे बनले आहे, अशी कबुली देताना चंद्रशेखर म्हणाले, आपल्याला केवळ दुर्मिळ खनिज आणि धातूंचे उत्पादनच नाही तर या देशात संपूर्ण मूल्य साखळी विकसित करावी लागेल. आणि आम्ही निश्चितपणे त्यावर काम करत आहोत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील सहकार्य हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, यावरही त्यांनी भर दिला.

ते म्हणाले की, दुर्मिळ खनिज घटकांची भारताची वाढती गरज ही नवीन तंत्रज्ञानाच्या उदयाशी देखील जुळलेली आहे. आपली भूमिका मोठी आहे कारण आपण चुंबक, विद्युत वाहने आणि पवन चक्कीबद्दल बोलत आहोत. या सर्व नवीन क्षेत्रात दुर्मिळ खनिज आवश्यक आहे. देशाच्या स्वच्छ ऊर्जा आणि उत्पादनविषयक महत्त्वाकांक्षेसाठी हे खनिज सर्वांगाने महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांची कंपनी ‘आयआरईएल’ची सध्याची प्राथमिकता आयातीवर जास्त अवलंबून राहण्याऐवजी स्वावलंबी मूल्य साखळी तयार करणे आहे असे ते म्हणाले.

चंद्रशेखर यांनी असेही नमूद केले की ते पाच दशकांहून अधिक काळ दुर्मिळ पृथ्वी क्षेत्रात काम करत आहेत आणि आयआरईएलला केंद्र आणि राज्य सरकारांकडून पाठिंबा मिळत आहे. त्यांनी असेही नमूद केले की, भारताला व्हिएतनाम आणि कझाकस्तानसारख्या देशांकडूनही तांत्रिक आणि अन्य सहकार्य मिळत आहे.