मुंबई : भारत-अमेरिका व्यापार चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याच्या आशेने मंगळवारी प्रमुख निर्देशांकांनी दमदार १ टक्क्यांहून मोठी तेजी दर्शवली. सोमवारच्या सत्रातील निराशा धुवून काढत मंगळवारी प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सत्रात जवळपास ६५० अंशांची झेप घेतली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९४.९५ अंशांनी वधारून ८२,३८०.६९ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६५७.७४ अंशांच्या उसळीसह ८२,४४३.४८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १६९.९० अंशांची भर घातली आणि तो २५,२३९.१० पातळीवर पोहोचला.
निर्यातदारांसाठी अनिश्चितता निर्माण करणाऱ्या व्यापार शुल्काच्या पार्श्वभूमीवर, भारतात दाखल झालेल्या अमेरिकेच्या शिष्टमंडळाने प्रस्तावित व्यापार करारासाठी चर्चा सुरू केली असल्याचे मंगळवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय दोन दिवसांनी निर्णय अपेक्षित असलेल्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या (फेड) पतधोरण बैठकीपूर्वी आशियाई आणि अमेरिकी शेअर बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात आशावादी वातावरण निर्माण केले.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये, कोटक महिंद्र बँक, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र, मारुती, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. तर एशियन पेंट्स आणि बजाज फायनान्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.
अमेरिकी फेडच्या आगामी बैठकीत २५ आधारबिंदूंच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेने निर्माण झालेले अनुकूल जागतिक संकेत आणि भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींबद्दल चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आशावादामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा उत्साह संचारला आहे. हा कल चालू आठवड्यात कायम राहण्याची अपेक्षा आहे. बरोबरीने नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी आणि सणोत्सवी हंगामातील मागणीच्या अपेक्षांमुळे वाहन निर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांनी चांगली कामगिरी केली, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
शेअर बाजार आकडेवारी
सेन्सेक्स ८२,३८०.६९ ५९४.९५ ( ०.७३%)
निफ्टी २५,२३९.१० १६९.९० ( ०.६८%)
तेल ६७.०७ -०.५५
डॉलर ८८.०८ – ८ पैसे