मुंबई: देशाच्या उद्योग-व्यवसायात एकूण महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३५.७ टक्के स्थिर असताना, नेतृत्वपदी महिला असण्याचे प्रमाण प्रथमच २० टक्क्यांवर गेले आहे, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या पाहणीतून पुढे आले. महिलांचा वरचष्मा असलेल्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक सेवा क्षेत्र हे ४४.६ टक्के महिला कर्मचाऱ्यांसह आघाडीवर आहे, त्यानंतर माहिती-तंत्रज्ञान संलग्न सेवा (आयटीईएस) ४१.७ टक्के महिलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. औषध निर्माण (२५ टक्के महिला), गतिमान खपाचे ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्र – एफएमसीजी (२३ टक्के) आणि उत्पादन क्षेत्र (१२ टक्के ) यांसारख्या क्षेत्रांनी समावेशक प्रयत्नांना गती दिली आहे, असे ‘बेस्ट कंपनीज फॉर वुमेन इन इंडिया’ (बीसीडब्ल्यूआय) सूचीच्या १० व्या आवृत्तीतील निष्कर्षांतून पुढे आले आहे.

प्रमुख कार्यस्थळ संस्कृती सल्लागार अवतार आणि समावेशक कार्यस्थळाला प्रोत्साहनासाठी कार्यरत सेरामाउंट यांनी संयुक्तपणे ही पाहणी केली आहे. ‘बीसीडब्ल्यूआय’च्या ताज्या सूचीत १२५ कंपन्यांचा समावेश आहे. नेतृत्वपदी महिलांचे प्रमाण असणाऱ्या उद्योग क्षेत्रात औषध निर्माण क्षेत्र आघाडीवर आहे. या क्षेत्रातील २४.८ टक्के कार्यकारी अधिकारी पदावर महिला आहेत. त्यानंतर सक्षमता केंद्रे अर्थात जीसीसीमध्ये २२ टक्के महिला नेतृत्व पातळीवर आहेत.

महिला नोकरी का सोडतात?

या निमित्ताने केलेल्या पाहणीत महिला आणि पुरुष नोकरी का सोडतात याची कारणेही तपासली गेली. आघाडीच्या व उत्कृष्ट कंपन्यांमध्ये महिला आणि पुरुषांच्या नोकरी सोडण्याच्या दरामध्ये समानता दिसून येते, जे सुमारे २० टक्क्यांच्या आसपास आहे. स्त्री-पुरुष दोहोंसाठी नोकरी सोडण्याचे पहिले कारण हे ‘नोकरीच्या इतरत्र उत्तम संधी’ हेच आहे. तथापि, महिलांसाठी, आरोग्यासंबंधित समस्या आणि कुटुंब-कल्याणाला अग्रक्रम हे एक देखील प्रमुख कारण समोर आले. मुलांची काळजी घेण्याच्या जबाबदारी या कारणापेक्षा याचे प्रमाण जास्त आहे.

महिलांच्या कार्यप्रगतीचे कौतुक करताना, अवतारच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या की, “समावेशकता आणि आपलेपणाला तसेच महिलांना प्राधान्याच्या हेतूपूर्वक आणि केंद्रित कृतीचे परिणाम आपल्यासमोर आहेत. २०१६ मध्ये सरासरी २५ टक्के महिलांचे कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व होते, ते या वर्षी सर्वोत्तम कंपन्यांमध्ये एकत्रितपणे ३५.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नेतृत्वपद अर्थात निर्णयाधिकार असलेल्या पदावर महिलांचे प्रमाण २०१६ मधील १३ टक्क्यांवरून, २० टक्के असे वाढले आहे. सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे असे प्रयत्न केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत समाविष्ट भारतीय कंपन्यांचे प्रमाण २०२१ मधील २५ टक्क्यांवरून यावर्षी ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.”

महिलांसाठी सर्वोत्तम अशा प्रमुख १० कंपन्या

अवतार आणि सेरामाउंट यांच्या पाहणीतून भारतातील महिलांसाठी अव्वल १० सर्वोत्तम कंपन्या अशा:

१. ॲक्सेंच्युर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

२. ॲक्सा एक्सएल इंडिया बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

३. केर्न ऑइल अँड गॅस वेदांत लिमिटेड

४. ईवाय

५. केपीएमजी

६. मास्टरकार्ड इन्कॉर्पोरेशन

७. ऑप्टम ग्लोबल सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

८. प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया

९. टेक महिंद्र लिमिटेड

१०. विप्रो लिमिटेड