मुंबई : भारताच्या चालू खात्यावरील तूट सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ११.४ अब्ज डॉलरच्या पातळीवरून, १०.५ अब्ज डॉलर अशी घसरली आहे. तुटीचे हे प्रमाण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्यांवर स्थिरावले आहे. रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीचा दिलासादायी भाग हा की, वर्षभरापूर्वी हीच तूट १६.८ अब्ज डॉलरपर्यंत फुगली होती.

हेही वाचा >>> गौतम अदाणींचे अच्छे दिन! अदाणी पोर्ट्सने ३०८० कोटींना खरेदी केलं गोपाळपूर बंदर

उल्लेखनीय बाब म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीतील थेट विदेशी गुंतवणुकीचा नक्त प्रवाह तब्बल ८.५ अब्ज डॉलरवर मर्यादित होता.  आधीच्या वर्षातील याच नऊ महिन्यांमध्ये देशात आलेल्या २१.६ अब्ज डॉलरच्या तुलनेत तो खूप कमी होता. त्याचप्रमाणे, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यातील वाढ सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये अवघी ६ अब्ज डॉलर होती, तर वर्षापूर्वी याच तिमाहीत चलन साठ्यात ११.१ अब्ज डॉलरची भर पडली होती. तरी या घटकांनी चालू खात्यावरील तुटीत वाढ करणारा विपरित परिणाम साधलेला नसल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेली आकडेवारी दर्शवते.

हेही वाचा >>> गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”

तिसऱ्या तिमाहीत परराष्ट्र व्यापार तूट देखील आधीच्या वर्षातील ७१.३ अब्ज डॉलरच्या तुलनेत ७१.६ अब्ज डॉलर अशी किंचित जास्त होती. तथापि सॉफ्टवेअर, व्यवसाय आणि प्रवासी सेवांच्या वाढत्या निर्यातीमुळे सेवा निर्यातीत वार्षिक आधारावर ५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेवा निर्यातीतून झालेल्या प्राप्तीतही वाढ झाल्यामुळे चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत झाली. शिवाय परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकीने सरलेल्या तिमाहीत १२ अब्ज डॉलरचा निव्वळ प्रवाह नोंदवला, जो एका वर्षापूर्वी ४.६ अब्ज डॉलरच्या आसपास होता. अनिवासी भारतीयांच्या ठेवीतही २.६ अब्जावरून ३.९ अब्ज डॉलरचा नोंदवलेला वाढीव प्रवाह तुटीवर नियंत्रणास मदतकारक ठरला.