नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादन दर सरलेल्या जानेवारी महिन्यात ३.८ टक्क्यांपर्यंत घसरले, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. मुख्यतः उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे, देशातील कारखानदारीतील गतिमानतेचे मापन असलेला हा दर डिसेंबर २०२३ मधील ४.२ टक्क्यांच्या तुलनेत खालावला आहे. गत वर्षी जानेवारी २०२३ मध्ये औद्योगिक उत्पादन वाढीचा दर ५.८ टक्के नोंदवला गेला होता.
हेही वाचा >>> किरकोळ महागाई दर फेब्रुवारीमध्ये ५.०९ टक्क्यांवर
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून, सरलेल्या जानेवारीमध्ये निर्मिती क्षेत्रातून उत्पादनवाढ ३.२ टक्के राहिली, जी आधीच्या वर्षीच्या याच महिन्यातील ४.५ टक्क्यांवरून खाली आली आहे. जानेवारीत खाण उत्पादनात ५.९ टक्क्यांची, तर वीज निर्मितीत ५.६ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यात गेल्यावर्षी अनुक्रमे ९ टक्के आणि १२.७ टक्के अशा दमदार वाढीचा दर राहिला होता. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ ५.९ टक्क्यांची राहिली आहे, जी आधीच्या वर्षातील याच दहा महिन्यांच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी वाढली होती. जानेवारी २०२३ मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन ५.८ टक्क्यांनी वाढले होते. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख उद्योगांचे औद्योगिक उत्पादन दरामध्ये सुमारे ४० टक्के योगदान आहे. यामुळे, हे औद्योगिक विकासदराचे महत्त्वपूर्ण घटक मानले जातात.